मुंबई - मुंबई पोलीस आयुक्त पदी वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांची नियुक्ती करण्यात आली ( Sanjay Pandey as Mumbai Police Commissioner ) आहे. त्यांच्या नियुक्तीचे परिपत्रक राज्यसरकार कडून काढण्यात आले होते. त्यानंतर मावळते पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडून संजय पांडे यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यावर महाविकास आघाडी सरकारमधील काही नेते नाराज होते. त्यामुळे सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. संजय पांडे यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. तिथे गेल्या आठवड्यात रजनीश शेठ यांना नेमण्यात आले होते. पांडे यांच्या नावाला लोकसेवा आयोगाकडून हिरवा कंदील न मिळाल्याने त्यांना पोलीस महासंचालक पदी कायम नेमता आले नाही. आता मात्र मुंबई सारख्या महत्त्वाच्या पदी घेऊन महाविकास आघाडी सरकारने त्यांच्यावर विश्वास कायम ठेवला आहे.
संजय पांडे यांची पोलीस महासंचालक पदावर राज्य सरकारकडून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, लोकसेवा आयोगाकडून संजय पांडे यांच्या नियुक्तीला विरोध दर्शविण्यात आला होता. संजय पांडे यांच्या पोलीस महासंचालक पदाच्या नियुक्ती वरून मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेत राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले देखील होते. तसेच यूपीएससीने सुचवलेल्या नावांचा विचार का करण्यात आला नाही, अशी विचारणा देखील करण्यात आली होती. संजय पांडे संदर्भात राज्य सरकारला इतकी हमदर्दी का, असा प्रश्न देखील मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला होता. यूपीएससीने सुचवलेल्या नावापैकी नियुक्ती करणार की नाही, असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारल्यानंतर राज्य सरकारने पोलीस महासंचालक पदी रजनीश शेठ यांची ताबडतोब नियुक्ती केले. त्यानंतर अतिरिक्त कारभार संजय पांडे यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र, आज त्यांची बदली मुंबई आयुक्त पदी करण्यात आली आहे.
कोण आहे संजय पांडे
संजय पांडे हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी असून, नुकत्याच झालेल्या बदलीमुळे ते राज्य सरकारवर नाराज होते. संजय पांडे हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमवीर सिंग यांची होमगार्डच्या प्रमुख पदी वर्णी लागल्याने संजय पांडे यांनी तुलनेने काम महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. संजय पांडे यांच्या नाराजीनंतर त्यांना महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक पदावर नियुक्ती देण्यात आली होती.
हेही वाचा - Heroin Seized Mumbai : मुंबई विमानतळावर 56 कोटींचे ड्रग्ज जप्त; सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई