मुंबई - पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे तेथील जीवनमान पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यासाठी तेथील नागरिकांना मदत म्हणून राज्यभरातून मदत होत असताना दिव्यांगही मागे नाहीत. काल बुधवारी अपंग मैत्री संस्थेच्या माध्यमातून दादर (पश्चिम) स्थानक परिसरात दिव्यांगांनी स्वतः बनविलेल्या राख्यांची विक्री करण्यात आली. आणि त्यातून मिळणारी रक्कम पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर सर्व स्तरातून मदत होत आहे. आम्ही त्यांना मदत करण्याचे ठरवले. म्हणून आम्ही तयार केलेल्या राख्या विकून यातून जमा होणारा निधी महाराष्ट्रातील पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री आर्थिक सहायता निधीमध्ये जमा करण्यात येणार आहे, असे अपंग मैत्री संस्थेचे सचिव विलास हळदणकर यांनी सांगितले. दिव्यांगांनी राबविलेल्या या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता.