मुंबई - बुधवारी सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने नवी मुंबईकरांना धडकी भरवली आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने शीव-पनवेल महामार्गावर कोंडी झाली होती. नवी मुंबईतील अनेक ठिकाणे पाण्याखाली गेली होती.
बऱ्याच दिवसांचा ब्रेक घेऊन पुन्हा एंट्री करणाऱ्या पावसाने सकाळपासूनच मुंबई शहर, उपनगरांसह ठाणे, नवी मुंबईवर 'धार' धरली आहे. शहरातील अनेक सबवेमध्ये पाणी साचले होते. त्यात कोपरखैरणेमधील सबवेचाही समावेश होता. सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ येथे उड्डाणपुलाखाली पाणी भरले होते. फाटा मार्गावर रस्त्यावर मोट्या प्रमाणावर पाणी साचल्याने येथे वाहनांना मार्ग काढता येत नव्हता.
नेरूळ ते सानपाड्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत होत्या. बेलापूर आणि ऐरोली भागातील बसडेपोमध्ये पाणी भरले होते. वस्त्यांमध्ये शिरलेले पाणी, पाण्यावर तरंगणारी वाहने, एखाद्या नदीसारखे प्रवाहीत झालेले रस्ते हे चित्र पाहिल्यावर ही ‘नवी तुंबई’ ची नांदी तर नव्हे ना, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.