मुंबई - चातकाप्रमाणे पावसाची वाट बघणाऱ्या मुंबईकरांना अखेर दिलासा मिळाला आहे. रविवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईकर आनंदीत झाले आहेत. या पावसामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
रविवारी रात्री चेंबूर, सायन, दादरसह उपनगरात जोरदार पाऊस पडला. पाऊस लांबणीवर पडल्याच्या बातम्यांमुळे बेसावध मुंबईकरांची अचानक आलेल्या पावसामुळे धावपळ उडाली. जवळपास अर्धा तास ढगांच्या गडगडासह पाऊस कोसळत होता. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. या अगोदर उत्तर महाराष्ट्रात हवामान खात्याकडून गारपीटीचा इशारा देखील देण्यात आला होता. १४ जूनपर्यंत मान्सून कोकणात दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर राज्यातील उर्वरीत भागात मान्सूनचे आगमन लांबण्याची शक्यता आहे. भारताच्या पश्चिम-किनारपट्टीजवळ असलेल्या अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.