मुंबई : किरीट सोमैय्या यांच्या मुलुंड येथील कार्यालयातीलच दोन कर्मचाऱ्यांनी मिळून संगनमत करून श्रवणयंत्र मशिनमधील वाटपात घोटाळा केल्याचे उघड झाले. जवळपास सात लाखांचा अपहार केल्याप्रकरणी सोमय्या यांच्या कार्यालयातील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रज्ञा गायकवाड आणि श्रीकांत गावित या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलूंडमध्ये किरीट सोमैय्या यांचे घर आणि कार्यालय आहे.
लाखोंच्या श्रवणयंत्रांचा परस्पर अपहार : 'ऐका स्वाभिमानाने' या सामाजिक उपक्रमांतर्गत श्रवणयंत्र वाटप करण्यात येत होते. मात्र, यातच कार्यालयातील दोघांनी गैरव्यवहार केल्याची माहिती समोर येत आहे. लाखोंच्या श्रवणयंत्रांचा परस्पर अपहार झाला असून कार्यालय प्रमुखांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी नवघर पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी नवघर पोलिसांनी दोघांना नोटीस देऊन या पुढील तपास नवघर पोलीस स्टेशन करत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
७ लाख ३६ हजार रुपयांचा अपहार : कार्यालयप्रमुख प्रफुल्ल कदम यांच्या तक्रारीवरुन नवघर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. युवक प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट ही किरीट सोमैय्या यांची संस्था आहे. संस्थेमार्फत ५०० रुपयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना श्रवणयंत्र दिले जाते. याच कार्यालयातील प्रज्ञा जयंत गायकवाड आणि श्रीकांत रमेश गावित यांनी ७ लाख ३६ हजार रुपयांचा अपहार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. नवघर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा नोंद झालेला आहे. घोटाळे उघडकीस आणणारे भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांच्याच कार्यालयात गैरव्यवहार झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
ठाकरे परिवारावर केले होते आरोप : उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या कथित मालकीच्या अलिबाग येथील १९ बंगल्यांच्या घोटाळ्यासंदर्भात कोलई, रेवदंडा पोलीस स्टेशन, रायगडमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती भाजप नेते सोमैय्या यांनी दिली होती. भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी 1 जानेवारीला 19 बंगल्यांप्रकरणी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. किरीट सोमैय्या हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत.