मुंबई- वातानुकूलित यंत्रणा (एसी) चालू असलेल्या कोणत्याही कार्यालय आणि कक्षांमध्ये कोरोनाचे विषाणू हे अधिक काळ जिवंत राहतात. त्यामुळे, कोरोना विषाणुच्या प्रतिबंधासाठी राज्यातील सर्वच शासकीय कार्यालयांनी वातानुकूलित यंत्रणेचा शक्यतो वापर टाळावा, अशा सुचना आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी राज्य सरकारच्या सर्व विभागांना दिल्या आहेत.
![corona fear mumbai](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/6471110_th.jpg)
यासाठी आज आरोग्य विभागाने परिपत्रक काढले आहे. शिंकणे आणि खोकल्यातून जे कण हवेत उडतात त्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणू असतात. हे विषाणू नंतर धुळकणांसोबत वस्तुच्या पृष्ठभागावर राहतात आणि कमी तापमान असलेल्या कक्षात ते अधिक काळ जिवंत राहतात. त्यामुळे, सरकारी कार्यालयात वातानुकूलित यंत्रणेचा वापर बंद करावा किंवा अपवादात्मक स्थितीमध्येच त्याचा वापर करावा. केंद्र सरकारने करोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, त्यामध्ये वातानुकूलित यंत्रणेचा वापर कमी करण्यास बजावले आहे, असे आरोग्य विभागाच्या परिपत्रकात सांगण्यात आले आहे.
तसेच विभाग प्रमुखांनी परिपत्रकातील सर्व बाबी आपल्या विभागतील सर्व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी, असे या पत्रात सांगितले आहे. सोबतच आता सरकारी कार्यालया प्रमाणे खाजगी आस्थापनांनी व नागरिकांनी देखील आपल्या घरांमधील वातानुकूलित यंत्रणांचा वापर कमी करावा, असे परिपत्रकात सांगण्यात आले आहे.
हेही वाचा- CORONA : विद्यार्थ्यांना सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः सिंगापूरमधील दूतावासाशी संपर्कात