मुंबई - गेल्या काही दिवसात उपनगरातील मुलुंड परिसरात कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्णात सर्वात सुरक्षित अशी या विभागाची ओळख होती. परंतु दोन दिवसांपूर्वी एक दिवसात 50 पेक्षा जास्त जणांचे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी तातडीने मुलुंड विभागाला भेट दिली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा आणि रुग्णांचे लवकरात लवकर निदान व्हावे, यासाठी शिवसेनेतर्फे वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिवसेना मुलुंड विधानसभा, एम सी एच आय आणि भारतीय जैन संघटना यांनी आयोजित केलेल्या मुलुंड पूर्व येथील वैद्यकीय शिबिरामध्ये २८८ नागरिकांची वैद्यकीय तपासणी झाली. यात २८ रुग्णांना सर्दी-खोकला-ताप असल्याचे समोर आले आहे. अशा नागरिकांची नावे पुढील उपचारासाठी महानगरपालिकेकडे पाठवण्यात आली आहेत.
मुलुंडमधील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 100 च्या वर आकडा पोहचला आहे. ही संख्या कमी व्हावी यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून काम सुरू आहे. कोरोना रुग्णांचे लवकरात लवकर निदान व्हावे, यासाठी म्हाडा कॉलनी, पत्रा चाळीत वैद्यकीय शिबीर आयोजित केले होते. अशा प्रकारचे शिबीर मुलुंड पश्चिम येथे देखील ठेवण्यात येणार आहे. दरम्यान लोकांनी घराबाहेर निघू नये. तरच तुमचे कुटुंब सुरक्षित राहू शकते, असे शिवसेनेचे अभिजित चव्हाण यांनी सांगितले.