मुंबई - येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ताबा अदानी समूहाकडे येताच अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड ही कंपनी देशातील सर्वात मोठा एअरपोर्ट ऑपरेटर ठरले आहे. मात्र, मुंबई विमानतळ येताच अवघ्या काही दिवसातच कंपनीने आपले मुख्यालय मुंबईतून अहमदाबादमध्ये हलविले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अदानी समूह चर्चेत आले आहे.
जीव्हीके कंपनीकडून ओव्हरटेक
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापन जीव्हीके समूहाकडे होते. पण, जीव्हीके कंपनी आर्थिक अडचणीत सापडली होती. जीव्हीके कंपनीवर सुमारे अडीच हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर झाला होता. परिणामी जीव्हीके कंपनीला विमानतळ व्यवस्थापन विक्री काढल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे गेल्या वर्षी अदानी समूहाने मुंबई विमानतळ खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. तसा करारसुद्धा करण्यात आलेला होता. जीव्हीके आणि अदानीमधील कराराला भारतीय विमानतळ प्राधिकरणाने हिरवा कंदील दिला होता. इतर काही खात्यांकडून अद्याप यासाठी मंजुरी मिळणे बाकी होती. अखेर सर्व मान्यता मिळवून अदानी समूहाने जीव्हीके कंपनीकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा गेल्या काही दिवसांपूर्वी घेतला आहे.
उलट-सुलट चर्चा सुरू
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये अदानी समूहाने जीव्हीके ग्रुपसोबत करार केला होता. त्यानुसार जीव्हीकेच्या नावे असणारा 50.50 टक्के वाटा अदानी समूहाच्या नावे करण्यात येण्याचे निश्चित झाले होते. त्याचप्रमाणे मुंबई विमानतळामध्ये 13.50 टक्के वाटा बिडवेस्ट कंपनी आणि 10 टक्के वाटा हा एअरपोर्ट कंपनी ऑफ साऊथ आफ्रिका या कंपनीचा होता. त्यामुळे या दोन्ही कंपनीशी अदानी समूहाने करार करून त्यांच्याकडील 23.5 टक्के वाटाही आपल्या नावावर करण्याचा करार केला होता. त्यानुसार ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडकडे मुंबई विमानतळ आले आहे. मात्र, मुंबई विमानतळ येताच अवघ्या काही दिवसातच कंपनीने आपले मुख्यालय मुंबईतून अहमदाबादमध्ये हलविले आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रात पुन्हा एकदा उलट-सुलट चर्चा सुरू झालेली आहे.
अदानींकडे आता सात विमानतळ
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ताबा घेतल्यामुळे अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड आता देशातील सर्वात मोठी विमानतळ पायाभूत सुविधा पुरविणारी कंपनी झाली आहे. आता अदानी समूहाकडे देशातील सात विमानतळाचा ताबा मिळालेल्या आहे. ज्यामध्ये लखनऊमधील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ (उत्तर प्रदेश), जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ (राजस्थान), तिरुअनंतपुरममधील त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ (केरळ), गुवाहाटीमधील लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ (आसाम), मंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळ (कर्नाटक), सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ (गुजरात) आणि आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा (महाराष्ट्र) समावेश आहे. या सात ही विमानतळांच्या विकास, व्यवस्थापन आणि परिचालनाची पुढील 50 वर्षांसाठी जबाबदारी असेल. विमानतळांच्या संख्येनुसार अदानी समूह देशातील सर्वात मोठी एअरपोर्ट ऑपरेटर ठरली कंपनी आहे.
हेही वाचा - 'मुख्यमंत्र्यांना अशीच गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊ दे' मनसेची विठ्ठलाकडे प्रार्थना