मुंबई: इन्फ्ल्यूएंजाचा प्रसार आधी प्राण्यामधून मानवात होत होता. आता हा प्रसार मानवातून मानवाला होत आहे. त्यामुळे प्रसार वाढला आहे. आयसीएमआरच्या सोबत झालेल्या चर्चेत सौम्य स्वरुपाची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या चाचण्या करण्याची गरज नाही. जे रुग्ण आंतर रुग्ण विभागात आणि अतिदक्षता विभागात दाखल आहेत, अशा रुग्णांची चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चाचणीमध्ये आलेले वैद्यकीय अहवालांची नोंद त्वरित संबधित यंत्रणांकडे करण्यात येणार असल्याचे आरोग्य सेवा संचालनालयाकडून सांगण्यात आले आहे.
अशी घ्या काळजी: राज्यात गेल्या काही दिवसात ताप, सर्दी, खोकला असलेल्या इन्फ्ल्यूएंजा आजाराचे रुग्ण महाराष्ट्रात वाढू लागले आहेत. राज्यात जानेवारीपासून एच १ एन १ मुळे ३ तर एच ३ एन २ मुळे १ मृत्यू झाला आहे. तसेच ३ संशयित मृत्यूची नोंद झाली आहे. इन्फ्ल्यूएंजाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावे, हात सतत स्वच्छ धुवावेत, गर्दीत जाणे टाळावे, पाणी जास्त पिणे, लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
हॉस्पिटलवरील ताण कमी होणार : देशभरात गेले तीन वर्षे कोरोना व्हायरसचा प्रसार होता. हा प्रसार काही प्रमाणात आटोक्यात आला असतानाच एच ३ एन २ या व्हायरसमुळे मृत्यू होऊ लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये नव्या व्हायरसमुळे भीती निर्माण झाली आहे. इन्फ्ल्यूएंजाच्या पार्श्वभूमीवर नेमक्या चाचण्या कोणी करायच्या असा प्रश्न गेले काही दिवस उपस्थित केला जात होता. आता आरोग्य सेवा संचालयाने नेमक्या कोणी चाचण्या करायच्या हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे चाचणी करणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी होऊन हॉस्पिटलवरील ताण कमी होणार आहे. तसेच ज्याची चाचणी करणे खरोखर गरजेचे आहे त्यांचीच चाचणी होणार आहे.