मुंबई: स्वच्छता यात्रेची सुरुवात अंधेरी पश्चिम येथील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था येथून झाली. यात्रेच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्य स्वच्छता अभियानाचे राज्य समन्वयक सुभाष दळवी यांनी मुंबईतील स्वच्छता विषयक आव्हाने आणि विविध अभिनव उपाय योजना राबवून त्या आव्हानांवर करण्यात आलेली मात याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यादरम्यान भेट देण्यात येणाऱ्या ठिकाणांची संक्षिप्त माहिती आणि नियोजन याबाबत देखील त्यांनी माहिती दिली.
महिला बचत गटाचा गौरव: रगडापाडा परिसरात श्री आस्था महिला बचत गट यांच्या पुढाकाराने कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प अत्यंत सक्षमपणे सुरू आहे. या प्रकल्पात परिसरात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यात येते. त्याचबरोबर स्वच्छता यात्रेने टाकाऊ वस्तूंपासून बनवण्यात आलेल्या शोभेच्या वस्तूंची माहिती जाणून घेतली. याच ठिकाणी गुजरातहून आलेल्या सर्व पाहुणे मंडळींनी आणि रगडा पाडा परिसरातील मान्यवरांनी एकत्रितपणे स्वच्छतेची शपथ घेतली. विशेष म्हणजे, ही शपथ मराठी भाषेतून घेण्यात आली. या परिसरातील स्वच्छता, साफसफाई, सुशोभीकरण आणि कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प पाहून प्रभावित झालेल्या गुजरातच्या पाहुणे मंडळींनी आस्था महिला बचत गटाच्या मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.
गुजरातमध्ये प्रकल्प उभारणार: आरे कॉलनी परिसरातील कोंबडपाडा येथे सहयोग महिला बचत गटाच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्पाला गुजरातच्या पाहुणे मंडळींनी भेट दिली. या ठिकाणी असलेली स्वच्छता, हिरवाई, शांतता याचे कौतुक करतानाच घरोघरी मातीच्या माठात करण्यात येत असलेली कचऱ्यापासून खत निर्मितीची माहिती स्वच्छता यात्रेतील प्रतिनिधींनी घेतली. गुजरात राज्याच्या स्वच्छता अभियानाचे व्यवस्थापक जिग्नेश पटेल यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामांच्या धर्तीवर गुजरातमध्ये दळवी पॅटर्न पद्धतीचे कचऱ्यापासून खत निर्मिती करणारे प्रकल्प उभारणार असल्याचे नमूद केले.
यांची उपस्थिती: या दौऱ्याला बृहन्मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे विशेष कार्य अधिकारी तथा महाराष्ट्र स्वच्छता अभियानाचे राज्य समन्वयक सुभाष दळवी, गुजरात राज्यातील स्वच्छता अभियानाचे व्यवस्थापक जिग्नेश पटेल, गुजरातच्या प्रकल्प व्यवस्थापक भावना मिश्रा, गुजरात राज्यातून आलेल्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या आणि बचत गटांच्या महिला प्रतिनिधी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी आदी उपस्थित होते.
हेही वाचा: Nagpur Crime: अनैतिक संबंधांनी घेतला दोन महिलांचा जीव; दोघांना अटक