मुंबई: सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरच्या वापराबाबत मुंबई पोलीस आयुक्तांसह राज्याचे डीजीपी मार्गदर्शक तत्त्वे तयार करत आहेत. येत्या 2 दिवसांत ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. राज ठाकरे यांनी 3 मेपर्यंत मशिदीवरील लावण्यात येणारे लाऊड स्पीकर उतरवण्याची मागणी केली आहे. भोंगे उतरवले नाही, तर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याचे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील सतत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेत आहेत.
रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावू नयेत, असे कोर्टाचे आदेश आहेत. त्यातच राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. लाऊड स्पीकर सदर्भात न्यायालयाच्या निर्बंधाचे पालन करावे असे आवाहन गृहमंत्र्यांनी नुकतेच केले होते. भोंग्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील वातावरण तापण्याची शक्यता आहे. यातच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सरकार तसेच पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे.