मुंबई- बनावट सिमेंट विकणाऱ्या ७ जणांच्या टोळीला शहर पोलिसांच्या मालमत्ता कक्षातील पथकाने जेरबंद केले आहे. ही कारवाई गोरेगाव परिसरातील निर्मल रबर बोर्ड या ठिकाणी छापा मारून करण्यात आली. सदर टोळी नामांकित सिमेंट कंपन्यांच्या सिमेंट गोण्यांमध्ये हलक्या प्रतीचे सिमेंट टाकून विकत होते. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील वेगवेगळ्या परिसरांमध्ये अंबुजा सिमेंटच्या नावाखाली हलक्या प्रतीचे सिमेंट विकले जात असल्याची तक्रार अंबुजा सिमेंटच्या अधिकाऱ्यांकडून मुंबई पोलिसांच्या मालमत्ता कक्षाकडे करण्यात आली होती. पोलिसांकडून या प्रकरणी तपास केला जात होता. दरम्यान, गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गोरेगाव परिसरामध्ये छापा मारला. यात नामांकित कंपन्यांच्या सिमेंटच्या गोण्यांमध्ये हलक्या प्रतीचे सिमेंट भरताना ७ आरोपींना रंगेहात पकडण्यात आले.
याप्रकरणी मोहम्मद असलम लईस (५१), सेवालाल छोटेलाल सरोज (२८), पवन छोटेलाल सरोज (२०), ओम प्रकाश बरसात चौहान (३४), बुलाई पन्नालाल सरोज (४६), विजय संग्राम सहानी (२१), योगेश जगदीश कुरमी (२९), या सात जणांना अटक करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान ६५१ सिमेंटच्या गोण्या १३५० सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांसह इतर मुद्देमाल धरून २ लाख १५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिसांनी विविध कलमान्वये व कॉपीराईट अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा- मुंबई : दहिसर येथे वाढदिवसाचा केक खाल्ल्याने 17 जणांना विषबाधा