मुंबई : मुंबई पोलीस दलातील 8 हजार 70 पदांसाठी पोलीस भरती घेण्यात येत आहे. या भरतीसाठी जवळपास 7 लाख उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये यावर्षी ट्रांसजेंडर कॅटेगरीतील 24 जणांचे अर्ज देखील दाखल झाले असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीसाठी मैदानी चाचण्या सुरू झाल्या आहेत.
पोलिसांपुढे मैदानांचे आव्हान : मुंबई पोलीस दलातील पोलीस भरतीसाठी मागवलेल्या ७ लाख अर्जदारांची मैदानावर शारीरिक चाचणी घेणं हे आव्हान ठरत आहे. कारण, मुंबई पोलिसांनी इतर मैदानांचा शोध सुरु केला आहे. SRPFची गोरेगाव येथे दोन मैदान आहेत. मात्र, त्यांची देखील भरती प्रक्रिया सुरु असून ती पूर्ण झाल्यानंतरच ही मैदाने मुंबई पोलिसांना मिळू शकतात. मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील आवारात मोठे मोकळे मैदान असून हे मैदान मिळविण्याचेही पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.
7 लाख उमेदवार मैदानात : पोलिस भरतीच्या प्रक्रियासाठी सद्यस्थिती काही मैदाने योग्य स्थितीत नसल्याने त्यांचे सपाटीकरण करून धावण्यायोग्य केले जाईल. नंतरच त्यावर मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. हे मैदान मिळाल्यास कमी अवधीत जास्त उमेदवारांची मैदानी चाचणी पूर्ण होऊ शकते, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. 7 लाख उमदेवारांची मैदानी चाचणी वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.
कशी असणार शारीरिक चाचणी : पुरुषांना दोन शर्यतींमध्ये भाग घ्यायचा आहे, एक म्हणजे 1600 मीटर आणि दुसरी म्हणजे 100 मीटर आणि त्याचबरोबर गोळा फेक चाचणी घेतली जाईल. त्याचप्रमाणे महिलांना गोळाफेक व्यतिरिक्त 800 मीटर आणि 100 मीटर चाचणीत भाग घ्यायचा आहे. मुंबई पोलिसांच्या बहुतांश सशस्त्र विभाग कार्यलयाजवळ मैदाने आहेत. नायगाव, मरोळ येथे ही मैदाने आहेत. मात्र, दोनशे, चारशे मीटरच्या या मैदानांमध्ये 1600 मीटर धावणे अडचणीचे ठरणार असून अनेक फेऱ्या ठेवल्या तरी उमेदवार खूप असल्याने बराच कालावधी या प्रक्रियेसाठी वाया जाऊ शकतो. त्यामुळे मुंबई पोलिसांनी इतर मैदानांचा शोध सुरु केला आहे. सात लाख पेक्षा अधिक उमदेवारांची मैदानी चाचणी वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.
मानवी हस्तक्षेप टाळणार : मुंबई पोलीस भरती प्रक्रियेत कोणता गैरप्रकार व मानवी हस्तक्षेप होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांनी पूर्णपणे खबरदारी घेतली आहे. या भरती प्रक्रियेदरम्यान कमीतकमी मानवी हस्तक्षेप असावा यासाठी तांत्रिक यंत्रणांचा वापर करण्यात येत आहे. चुंबकीय पट्टे, सेन्सर हील्स, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) टॅग, प्रिझम स्टिक आणि प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून प्रत्येकाच्या बारीक हालचाली टिपण्यात येणार आहेत.
चुंबकीय टेप : भरतीसाठी छातीचे मोजमाप फार महत्त्वाचे असते. एक-एक इंच कमी पडल्यास भरतीमध्ये सामावून घेतले जात नाही. थोडक्यात काय अर्ज रद्द केला जातो. एखाद्या सेंटिमीटरनेही एखाद्याची संधी हुकते. त्यामुळे या ठिकाणी गैरप्रकार होण्याची शक्यता अधिक असते. कोणत्याही व्यक्तीने टेप घेऊन केलेले मापन हे कमी जास्त ठरू शकते. त्यामुळे चुंबकीय टेप वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छातीभोवतीच्या अंगास सर्व बाजूने टेप स्पर्श केल्यानंतर स्क्रीनवर मोजमाप दिसणार नाही. चुंबकीय टेपमुळे मोजमाप अचूक होईल अशी शक्यता आहे.
उंची मोजणारे सेन्सर बूट : उंची मोजताना, अर्जदार अनेकदा त्यांच्या पायाच्या बोटांवर किंवा टांचावर उभे राहून उंची वाढविण्याचा प्रयत्न करतात. हा प्रकार टाळण्यासाठी सेन्सर असलेले बूट वापरण्यात येणार आहेत. त्याचबरोबर डोक्यावरही सेन्सर असलेली मॅग्नेटिक पट्टी असेल. सेन्सर बुटात बोटे आणि टाच म्हणजेच पूर्ण पायाचा स्पर्श होईल आणि मग मॅग्नेटिक पट्टीला डोक्याचा स्पर्श होत झाल्यानंतर उंची इंडिकेटरमध्ये दिसली जाईल.
रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन : धावण्याच्या चाचणीत कोणी पहिल्यांदा रेषा ओलांडली यावरूनही अनेकदा वादविवाद होता. परीक्षकांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. हे टाळण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. धावपटूंना आरएफआयडी टॅग दिले जातील, जे अंतर आणि वेळ मोजतील आणि संगणकावर धावपटूंच्या माहितीची नोंद होईल. ही माहिती उमदेवारांना लगेचच समोर असलेल्या स्क्रीनवर पाहता येईल. त्यामुळे वादविवाद निर्माण होणार नाही.
गोळा फेकीसाठी प्रिझम स्टिकचा वापर : गोळा फेकीसाठीचे अंतर मोजण्यासाठी प्रिझम स्टिकचा वापर केला जाईल. प्रिझममध्ये एक सेन्सर असेल, ज्याद्वारे डेटाबेस तयार केला जाईल आणि गोळाफेकीत किती अंतर कापले गेले आहे याची माहिती नोंद होणार आहे. यामध्ये सर्व काही तांत्रिक पद्धतीने होणार असल्याने संशयाला जागा राहणार नाही.
डमी उमेदवारांना चाप : २०१९ या वर्षासाठीची १०७६ पदांसाठी २०२१ मध्ये भरती प्रक्रिया पार पडली. लेखी परीक्षा, मैदानी चाचणी नंतर वैद्यकीय आणि कागदपत्र पडताळणी घेण्यात आली. त्यावेळी लेखी आणि मैदानी चाचणी दरम्यान करण्यात आलेल्या चित्रीकरणात टिपलेले चेहरे आणि प्रत्यक्षात उपस्थित असलेले उमेदवार यामधील साम्य तपासण्यात आले. भरतीसाठी निवड झालेल्या अंतिम उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर मैदानी चाचणी, लेखी परीक्षा आणि वैद्यकीय तपासणीदरम्यान करण्यात आलेले चित्रीकरण खातरजमा करण्यासाठी पुन्हा तपासण्यात आले.
२० ते २५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल : त्यावेळी काही उमेदवारांच्यावतीने लेखी परीक्षा अन्य कुणी देत असल्याचे चित्रीकरणात दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी लेखी परीक्षेदरम्यान उमेदवारांनी स्वाक्षरी केलेले कागदपत्र तपासले. त्यामध्ये असलेली स्वाक्षरी आणि प्रत्यक्षात उमेदवाराची स्वाक्षरी यामध्ये तफावत आढळली. एका उमेदवाराच्या बाबतीत असा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सर्वच उमेदवारांचे वेगवेगळ्या टप्प्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले होते. मैदानी चाचणी देणारे आणि लेखी परीक्षेसाठी उपस्थित असलेल्या अनेकांचे चेहरे जुळत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी या उमेदवारांना कागदपत्रे घेऊन तपासणीसाठी बोलावले. त्यावेळी प्रत्यक्षात डमी उमेदवार लेखी परीक्षा, मैदानी चाचणी दिल्याचे समोर आले. याप्रकरणी मुंबईतील भोईवाडा पोलिस ठाण्यात २० ते २५ जणांविरुद्ध एक डझनहून अधिक गुन्हे दाखल केले होते.