मुंबई : राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी लार्सन अँड टुब्रो कौशल्य प्रशिक्षक संस्थेने (Larsen and Toubro Skill Trainer Institute) व्यवसाय प्रशिक्षण संचालनालयाच्या सहकार्याने आयटीआय प्रशिक्षकांसाठी आयोजित कौशल्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप (concluded skill training camp) संस्थेच्या मुंबईत मढ आयलंड येथील अकादमीत संपन्न झाला. त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) बोलत होते.
राज्यातील आयटीआय प्रशिक्षकांची उपस्थिती : लार्सन अँड टुब्रोचे समूह अध्यक्ष ए एम नायक, कौशल्य प्रशिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. रामकृष्णन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शहाणे, प्रशिक्षण संस्थेचे प्रमुख बी ए दमाहे, मास्टर ट्रेनर लार्सन अँड टुब्रो प्रिया सावंत, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ अपूर्वा पालकर, कौशल्य विकास संचालक दिगंबर दळवी तसेच संस्थेत कौशल्य प्रशिक्षण पूर्ण करीत असलेले राज्यातील आयटीआय प्रशिक्षक यावेळी उपस्थित होते.
एक प्रेरणादायी नाव : लार्सन अँड टुब्रो हे देशाच्या उद्योग जगतातील एक प्रेरणादायी नाव आहे. समूहातर्फे केलेल्या प्रत्येक कार्यात गुणवत्ता असते, असे सांगून एल अँड टी समूहाने देशातील अनेक राज्यांमध्ये कौशल्य प्रशिक्षण संस्था उभाराव्या व इतर उद्योग समूहांनी देखील युवकांच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी पुढे यावे, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.
मानसिकता बदलली पाहिजे : समाजात पांढरपेशा नोकऱ्यांना मान आहे. श्रम प्रधान कार्याला दुय्यम मानले जाते, ही मानसिकता बदलली पाहिजे, असे प्रतिपादन एल अँड टी चे समूह अध्यक्ष ए एम नायक यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला जगाची कौशल्य राजधानी बनविण्याचे उद्दिष्ट पुढे ठेवले आहे व कौशल्याच्या माध्यमातूनच देशाला आत्मनिर्भर बनविता येऊ शकते. देशाला कौशल्य राजधानी बनविण्याच्या दृष्टीने मात्र अजूनही फार मोठे कार्य करणे गरजेचे आहे. मात्र देशातील अर्ध्या अधिक कौशल्य प्रशिक्षण संस्था आज बंद आहेत; काही ठिकाणी पायाभूत सुविधा नाहीत तर काही ठिकाणी प्रशिक्षक नाहीत असे त्यांनी सांगितले.
१,००० आयटीआय प्रशिक्षकांचे कौशल्य प्रशिक्षण पूर्ण : एल अँड टी समूहाने मुंबई येथे सन २०२१ साली अत्याधुनिक सुविधा असलेली कौशल्य प्रशिक्षक अकादमी सुरु केली असून; त्याठिकाणी एल अँड टी मधील अनुभवी लोकांना अध्यापक प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे, असे त्यांनी नमूद केले. आतापर्यंत अकादमीने महाराष्ट्र शासनाच्या १००७ आयटीआय प्रशिक्षकांना या संस्थेत प्रशिक्षण दिले असून; या कौशल्याचा समाजात सकारात्मक परिणाम होईल असे त्यांनी सांगितले. लार्सन अँड टुब्रोने आपल्या सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत स्थापन केलेल्या लार्सन अँड टुब्रो कौशल्य प्रशिक्षक अकादमी अंतर्गत १,००० आयटीआय प्रशिक्षकांचे कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.