मुंबई: यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यास मान्यता देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या नेतृत्वात राज्यातील प्रमुख नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. विशेष म्हणजे या भेटीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांचाही समावेश होता. महाविकास आघाडी सरकार विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत वारंवार राज्यपालांना विनंती करत आली आहे. या अगोदर सुद्धा राज्यपालांना केलेल्या विनंतीनंतर निवडणुकीची प्रक्रिया बदलल्याने राज्यपालांनी त्याला नकार दिला होता.
राज्यपालांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
आता कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक घेण्यात यावी यासाठी शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. परंतु सध्या ज्या पद्धतीने राज्य सरकार व राज्यपाल यांच्यामध्ये विविध मुद्यांवर खडाजंगी सुरू आहे, ते पाहता जरी ही भेट सकारात्मक झाली असली तरी राज्यपाल या निवडणुकीसाठी या अधिवेशनात तरी परवानगी देतात का यावर प्रश्नचिन्ह आहे? कारण महाविकास आघाडी सरकारने विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया बदलली आहे. गोपनीय मतदाना ऐवजी हात वर करून मतदान घेण्यासाठी नियमात बदल करण्यात आला आहे व त्याकरता राज्यपालांची मंजुरी आवश्यक आहे. या अर्थसंकल्पी अधिवेशनात निवडणूक घेण्याचा प्रस्ताव याअगोदरच राज्यपालांकडे पाठवल्याची आठवण सुद्धा या प्रसंगी राज्यपालांना करून देण्यात आली. परंतु असे असून सुद्धा आता राज्यपालांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अध्यक्षपदाची निवडणूक काँग्रेससाठी महत्त्वाची!
विधानसभा अध्यक्ष हे पद काँग्रेसकडे आहे. गेल्या अधिवेशनात ही निवड झाली नाही. आता हायकमांडच्या दबावामुळे निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यामुळे सरकारमधील प्रमुखांना घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राजभवन वर गेले होते. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला आहे राज्यपाल कोश्यारी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर उमेदवाराचे नाव घोषित होईल. यासंदर्भात राज्यपालांची सविस्तर चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गेले अधिवेशन फक्त ५ दिवसाचे होते. अर्थसंकल्पीय अधिवेशन २५ मार्चपर्यंत जाहीर झालेले आहे. या कालावधीत विधानसभा अध्यक्ष पद रिक्त ठेवणे योग्य ठरणार नाही त्यासाठी एक तारीख द्यावी अशी विनंती केल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भेटीनंतर सांगितले.
राज्यपाल विरोधात ठराव व विनंती!
राज्यपालांना परत पाठवण्यासाठी विधिमंडळात ठराव आणण्यावर विचार सुरू आहे असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले होतं. आता हेच नाना पटोले राज्यातील प्रमुख नेत्यांना घेऊन राज्यपालांना विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी विनंती करण्यासाठी गेले. एकीकडे या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणा दरम्यान जो काही प्रकार घडला त्या मुळे राज्यसरकार व राज्यपालांच्या वादांत परत एकदा मोठी ठिणगी पडली आहे. अशा परिस्थितीत राज्यपाल काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सोमवारी याबाबत राज्यपालांकडून आदेश येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आदेशात विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेत केलेला बदल मान्य करून निवडणूक होते. की गुप्त पद्धतीने राज्यपाल निवडणूक घ्यायला सांगतात हे बघणे सुद्धा औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा : Sanjay Raut On Phone Taping Case : 'गोव्यातही शांतता! फोन टॅपिंग सुरु आहे'