मुंबई - पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना पुन्हा एकदा 3 महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारल्यानंतर संजय बर्वे यांना मुदतवाढ दिली. यापूर्वी देखील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संजय बर्वे यांना मुदतवाढ देण्यात आली होती.
संजय बर्वे यांनी विधानसभा निवडणुकीवेळी चांगली कामगिरी केली. तसेच अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर मुंबईत कुठलीही अप्रिय घटना घडू नये म्हणून त्यांनी विशेष मेहनत घेतली होती. याच त्यांच्या कामाची दखल मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा ३ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई पोलीस खात्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकार्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते. 30 नोव्हेंबरला संजय बर्वे हे सेवानिवृत्त होणार होते. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्त पदाच्या शर्यतीत ज्येष्ठ आयपीएस अधिकारी परमवीर सिंग, डॉ. रश्मी शुक्ला व डॉक्टर व्यंकटेशन यांची नावे चर्चेत होती.