मुंबई - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षांची सांगता होण्यासाठी केवळ १२ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. सरकारला मात्र त्यांचा विसर पडला आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने १०० कोटी २४ लाख रूपयांची तरतूद केली असली तरी दमडीचाही खर्च सरकारने केला नसल्याने साहित्यिक, कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरूवात १ ऑगस्ट २०१९ रोजी झाली. त्याच पार्श्वभूमीवर तत्कालीन भाजपा सरकारने जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी १०० कोटी रूपयांची तरतूद २०१९-२० च्या अर्थसंकल्पात केली होती. मात्र, त्यावेळी भाजपा सरकारकडून तो निधी वितरीत केला गेला नाही. राज्यात आता फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव घेऊन सत्तेत आलेल्या महाविकासआघाडी सरकारनेही याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. २० मार्च २०२० रोजी एक जीआरकाढून त्यात १०० कोटी २४ लाख रूपयांची तरतूद केली. भाजपा सरकारप्रमाणे या सरकारच्या निधीतून एका दमडीचाही निधी अद्याप वितरीत करण्यात आला नसल्याने याविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. माजी वित्तमंत्री व भाजपाचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही नुकतेच सरकारला एक पत्र लिहून हा निधी वितरीत करावा, अशी मागणी केली आहे.
मागील भाजपा सरकारने निधी जाहीर केला परंतु तो दिला नाही. आता राज्यातील पुरोगामी सरकारने १०० कोटी रूपयांची तरतूद केली. त्याचा मोठा गाजावाजा झाला परंतु तो निधी वितरीत करून तो खर्च का केला नाही? आता तरी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी निधी खर्च करावा आणि त्यांचा बहुमान करावा अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत वानखेडे यांनी केली आहे.
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरूवात होताना तत्कालीन भाजपा सरकारने १०० कोटी रूपयांच्या निधीची घोषणा करून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. तत्कालीन भाजप आमदार सुधाकर भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमली होती. जन्मशताब्दी वर्षासाठी आमच्या सरकारने उपलब्धकरून दिलेला निधी आत्तापर्यंत खर्च होऊ शकला नाही. यामुळे राज्यातील तमाम मातंग समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. हा निधी खर्च झाला पाहिले, अशी मागणी माजी आमदार भालेराव यांनी केली आहे.
१ ऑगस्टला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षांची सांगता होत आहे. खेदाची गोष्ट अशी आहे, आत्ताच्या आणि पूर्वीच्या सरकारनेही अण्णाभाऊ साठे यांचा गौरव करण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. अजूनही संधी गेलेली नाही. अण्णाभाऊंचा योग्य गौरव झाला पाहिजे. ते फक्त लोकशाहीर नव्हते तर ते संयुक्त महाराष्टाचे ते निर्माते होते, असे मत भाकपच्या मुंबई कौन्सिलचे सेक्रेटरी कॉ. प्रकाश रेड्डी यांनी व्यक्त केले आहे.
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भाजपाने केवळ निधी जाहीर केला होता परंतु तो दिला नाही. तो निधी गेला कुठे, असा सवाल महाराष्ट्र मातंग एकता दलाचे प्रमुख राजकुमार शिंदे यांनी केला आहे. आत्ता राज्यात असलेल्या सरकारने तरी हा निधी उपलब्ध करून अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांच्या प्रचारासाठी मदत करवा, अशी मागणी शिंदे यांनी केली.
दरम्यान, सामाजिक न्याय विभागातील उपसचिव स्तरावरील अधिकारी सूत्राने सांगितले की, जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमासाठी जीआर काढला असला तरी वित्त विभागाकडून अजून निधी वितरीत होऊ शकला नाही. यामुळे आता मंजूर झालेला सर्व निधी मिळेल की नाही, याबाबतही साशंकता आहे. मागील वर्षभरात प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम आयोजित करण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाकडून हा निधी खर्च केला जाणार होता. यासंदर्भात बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांना संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.