मुंबई: स्पर्धा परीक्षा समन्वय समितीला (Competitive Exam Coordinating Committee) आज अधिकृतरीत्या शासनमान्यता मिळाली आहे. स्पर्धा परीक्षा (विद्यार्थी) समन्वय समिती (संघ) महाराष्ट्र राज्य सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट १८६० अंतर्गत मान्यता मिळाली असून, 420/2022 (बी) या क्रमांकाने शासनदरबारी यशस्वीरीत्या नोंदणी झाली आहे. संघटनेचे बँक खाते लवकरच कार्यरत होणार असून कायद्याच्या चौकटीत राहून आपली कामे आणखी जोमाने व पारदर्शकपणे करता येतील, अशी माहिती समितीच्या प्रवक्त्याने दिली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) किंवा सरळ सेवा भरती अशा विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा पार करून जे विद्यार्थी नोकरीसाठी प्रयत्न करतात मात्र त्यांच्या हाती नोकरी पडत नाही किंवा ज्यांची कमाल वयोमर्यादा कोरोना महामारीमुळे वाढली आहे त्यामुळे त्यांना परीक्षेला बसता येत नाही, अशा असंख्य विद्यार्थ्यांच्या समस्यांना सोडवण्यासाठी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.