मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी अवधी दिला आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून आज किंवा उद्या सकाळपर्यंत विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांना शपथविधी दिली जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - राष्ट्रवादी काँग्रेसचा विधीमंडळ गटनेता कोण? आता राज्यपालांवर सर्व भिस्त
या हंगामी अध्यक्षांच्या यादीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे नाव सर्वात आघाडीवर असून ते तब्बल आठ वेळा विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे-पाटील हे सातवेळा तसेच उपमुख्यमंत्री म्हणून दोन दिवसांपूर्वी शपथविधी घेतलेले अजित पवार आणि भाजपमधून आमदार झालेले बबनराव पाचपुते हे सुद्धा ७ वेळा विधानसभेवर निवडून आले असल्याने यांच्यापैकी एका सदस्याच्या नावाचा विचार हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून होऊ शकतो.
हेही वाचा - 'मुख्यमंत्री १-२ वर्षांनी बदलला जाऊ शकतो, तर गटनेता बदलला तर काय झालं?'
त्यासोबतच काँग्रेसचे के. सी. पाडवी भाजपचे कालिदास कोळंबकर हे सुद्धा सातव्यांदा विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले आहेत. त्यानंतर माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची ही सहावी टर्म आहे. तर त्यासोबतच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील हे सहाव्यांदा निवडून आले असल्याने यापैकी एका सदस्याच्या नावाचा विचार राज्यपाल महोदयांकडून विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदासाठी होऊ शकतो.
हेही वाचा - संविधान, लोकशाही अन् इतर गोष्टींवर अश्विनी कुमार यांच्यासोबत विशेष चर्चा..
चौदाव्या विधानसभा निवडणुकीचे निकाल २४ ऑक्टोबरला जाहीर झाल्यानंतर काही दिवसातच विधिमंडळ कार्यालयाने राज्यपाल महोदयांना सदस्यांच्या ज्येष्ठतेनुसार दहा जणांची यादी हंगामी विधानसभा अध्यक्ष पदासाठी सोपवली होती. त्यामध्ये बाळासाहेब थोरात यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे, तर दिलीप वळसे-पाटील, अजित पवार, बबनराव पाचपुते, जयंत पाटील, कालिदास कोळंबकर या दहा जणांची नावे या यादीत आहेत.
हेही वाचा - सदस्यत्व जाण्याची भीती बाळगू नका; शरद पवारांचा नवनिर्वाचीत सदस्यांना धीर
हंगामी अध्यक्षांची निवड ही राज्यपाल करतात. त्यासाठी त्यांना ते शपथ देतात आणि हेच हंगामी अध्यक्ष सभागृहात नवनियुक्त आमदारांना शपथ देतात. बहुमत सिद्ध करण्यासाठी सुरू असलेल्या अधिवेशनाचे संपूर्ण कामकाज हंगामी अध्यक्ष करतात आणि त्यानंतर हेच हंगामी अध्यक्ष पुढील अधिवेशनाचा कार्यक्रम घोषित करतात. त्यानंतर पुढील अधिवेशनात नवीन कायम अध्यक्षांची निवड होते.