मुंबई - आज (बुधवार) सकाळी ८ वाजता महाराष्ट्र विधानसभेची बैठक बोलवण्यात आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यासंबधीचे पत्र प्रसारित केले आहे. यावेळी राज्यपाल कोश्यारी नवनिर्वाचीत सदस्यांना शपथ देणार आहेत.
महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर सर्व नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंना सरकार स्थापनेसाठी निमंत्रीत करावे अशी विनंती त्यांना करण्यात आली. त्यानुसार २८ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. हा शपथविधी संध्याकाळी ५ वाजता होईल असे सांगण्यात येत आहे. आज फक्त नवनिर्वाचीत आमदारांचा शपथविधी होईल.
दरम्यान, राज्यपालांना दिलेल्या आमदारांच्या समर्थनाच्या पत्रात अजित पवारांचा उल्लेख नसल्याचे समजते. याबाबत जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, की ते आमच्यातीलच आहेत. ते राष्ट्रवादीतच आहेत असे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे ते राष्ट्रवादीतच आहेत. ते परत येतील अशी आशा आहे असे पाटील म्हणाले.
दरम्यान, २३ नोव्हेंबरला शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीसांनी आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आपल्याकडे संख्याबळ नसल्याचे त्यांनी कबूल केले. याबरोबरच महाविकास आघाडीवर त्यांनी शरसंधान साधले. हे सरकार म्हणजे तीन पायांचा रिक्षा असून, आपल्याच ओझ्याखाली हे सरकार दबेल असे ते म्हणाले.