मुंबई - काही केल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबण्यास तयार नाही. आज भाजपची चौथी मेगाभरती झाली. यामध्ये काँग्रेसचे आमदार अमरीश पटेल, आमदार काशिनाथ पावरा, तसेच वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला. गोपीचंद पडळकर ढाण्या वाघ आहेत. त्यांनी बारामतीतून निवडणूक लढवावी असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पडळकरांना बारामतीच्या मैदानात उतरवणार
मी पक्षातील नेत्यांशी बोलतो. गोपीचंद पडळकर हे ढाण्या वाघ आहेत. त्यांनी बारामतीतून लढले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट संकेत दिल्याने गोपीचंद पडळकर विरुद्ध अजित पवार अशी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार मेगाभरती आहे. आज काँग्रेसचे आमदार अमरिश पटेल, आमदार काशिनाथ पवार यांच्यासह वंचितचे नेते गोपीचंद पडळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसांपासून हे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. आज अखेर त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले.
गोपीचंद पडळकर हे माझे जवळचे आणि लाडके मित्र आहेत. ते पुन्हा घरामध्ये परत आले आहेत. त्यांनी खऱ्या अर्थाने धनगर समाजासाठी व्रत स्विकारले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. पडळकर हे महाराष्ट्रातील संघर्ष करणारा युवा नेता आहे. कोणत्याही केसेस त्याला थांबवू शकत नाहीत. त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केल्याने मला आनंद होत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पडळकर हे लोकसभा वंचितमधून लढले होते. मला दुःख झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ४ लाख मते घेऊन पडळकरांनी त्यांची ताकद दाखवून दिली. पण समाजाच्या हितासाठी सरकारसोबत राहणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मी स्वत: साठी काही मागितले नाही. तुम्ही आमच्या समाजाला पाठबळ द्या, धनगर समाजाची जबाबदारी घ्या, तुम्हाला कायम आमची साथ असेल असे वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केले. २०१९ ला भाजपचेच सरकार येणार आहे. मात्र, जास्तीत -जास्त आमदार निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचे रान करु असेही पडळकर म्हणाले.