मुंबई: एसी लोकलच्या तिकीट दरात 50 टक्के कपात केल्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकल मधिल प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यामुळे एसी लोकलच्या भाडे कपातीनंतर पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ झाली. मात्र एसी लोकलच्या फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांना अडचण होत होती. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने शनिवारपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कल्याण, टिटवाळा आणि अंबरनाथ या स्थानकादरम्यान 12 एसी लोकल फेऱ्याची संख्या वाढविली आहे.
आता मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर एसी लोकल फेऱ्यांची संख्या 44 वरून 56 पर्यंत पोहोचलेली आहे. मध्य रेल्वेच्या निर्णयानंतर आता पश्चिम रेल्वेने सुद्धा आता उद्यापासून 12 एसी लोकल फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पश्चिम रेल्वेवर एसी सेवांची एकूण संख्या आता 20 वरून 32 पर्यंत पोहोचणार आहे.
पश्चिम रेल्वे प्रशासनाने सांगितले की पूर्वी प्रति दिवस साधारणता 1500 ते 2500 तिकिटांची विक्री होत होती. मात्र, वाढती उष्णता आणि तिकीट दराच्या कपातीमुळे प्रवासी संख्या वाढली. आता पाच हजाराहून अधिक तिकिटांची विक्री होत आहे. प्रवाशांचा हा प्रतिसाद पाहता फेऱ्यांमध्ये वाढ करणे अनिवार्य होते. त्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे.
हेही वाचा : स्मार्टफोनच्या अती वापराने तरुणांचे मानसिक आरोग्य होऊ शकते बाधित