मुंबई - विदर्भातील अत्यंत दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देणाऱ्या आणि त्यासाठीचा वारसा जपणाऱ्या गोंडवाना विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगाने 12-बी दर्जा प्रदान केला आहे. या दर्जामुळे मागील काही वर्षांपासून रखडलेला शैक्षणिक विकासाचा कार्यक्रम अधिक वेगाने होईल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
राज्यातील विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि त्यासाठीच आढावा घेण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे राज्यभर दौरा करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ते गोंडवाना विद्यापीठाच्या दौऱ्यावर असताना हा दर्जा मिळवून देण्याबाबत त्यांनी विद्यापीठाला आश्वस्त केले होते. या आश्वासनाची पूर्तता झाली आहे. यासाठी नगरविकासमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वपूर्ण पाठपुरावा केला असल्याची माहिती सामंत यांनी दिली.
वर्ष 2011 मध्ये स्थापन झालेल्या गोंडवाना विद्यापीठाने 12–बी दर्जा मिळविण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे प्रस्ताव पाठविला होता. हा प्रस्ताव आयोगाने मंजूर केला. तसे परिपत्रक विद्यापीठास पाठविले आहे. हा दर्जा प्राप्त झाल्यामुळे विद्यापीठाचा सर्वांगीण विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी विद्यापीठाला राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियानांतर्गत अनुदान प्राप्त करता येणार आहे. तसेच या दर्जामुळे विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयांनाही आयोगाच्या विविध योजनांचा निधी प्राप्त होणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली.
दरम्यान, गोंडवाना विद्यापीठाच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी पालकमंत्री शिंदे आणि महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे सहकार्य करीत आहे. विद्यापीठाला 12-बी दर्जा मिळाल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू, प्राध्यापक आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.