मुंबई - गुढीपाडवा आणि सोने खरेदी हे एक समीकरण बनले आहे. यादिवशी सोनेखरेदीसाठी ग्राहक मोठ्या संख्येने सराफाच्या दुकानात गर्दी करतात. पण यावेळी ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे सोन्याचे भाव २ हजारांनी कमी झाले आहेत.
येत्या दोन दिवसात मराठी नववर्ष दिन म्हणजेच गुढीपाडव्यास आरंभ होत आहे. वर्षातील वर्ष प्रतिपदा, अक्षय तृतीया, विजयादशमी हे तीन मुहूर्त आणि बलिप्रतिपदा हा अर्धा मुहूर्त असे एकूण साडेतीन मुहूर्त आहेत. यापैकी एक म्हणजे गुढीपाडवा मानला जातो. या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्व असते. त्यामुळे सोन्याच्या पेढ्यांवर विशेष गर्दी पाहायला मिळते. मात्र, सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. महिनाभरात सोन्याचे दर दोन हजार रुपयांनी घसरले आहेत.
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया वधारत असल्याने सोन्याच्या भावामध्ये घसरण होत आहे. महिनाभरात सोन्याचा दर प्रति तोळा दोन हजार रुपयांनी कमी होऊन ते ३४ ते ३५ हजारांवरुन ३२ हजारांवर आला आहे. २४ कॅरेटचा आजचा दर ३२,५०० इतका आहे. तर २२ कॅरेटचा दर ३०,७२१ इतका आहे. तर, चांदीचे भाव ४१ हजार ५०० रुपये प्रति किलोवरून ३९ हजारांवर आले आहेत. २६ फेब्रुवारी रोजी सोने ३४ हजारांवर गेले होते. मार्चच्या पहिल्या आठवड्यात ते ३३ हजारांवर आले. ९ मार्चपासून सोन्याच्या दरात सतत घसरण होत आहे.