मुंबई/जळगाव - गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वधारत असलेले सोन्याचे दर घसरले आहेत. टाळेबंदीच्या काळात 58 हजार रुपयांच्या घरात गेलेले सोन्याचे दर आता कमालीचे घसरले असून ते 45 हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. आज गुरुवारी दर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 45 हजार रुपयांपेक्षा कमी झाली आहे तर जळगावात गुरुवारी (दि. 4) सोन्याचे दर प्रतितोळा 44 हजार 950 रुपये इतके होते. ऐन लग्नसराईच्या सोन्याचे भाव कमी झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
कोरोनाच्या संकटामुळे लोकांनी सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. ऑगस्ट 2020 मध्ये, एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56 हजार 191 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती. मागील वर्षी सोन्याने ग्राहकांना 43 टक्के परतावाना दिला. मागील उच्चांकी दराच्या तुलनेत सोन्याचे दर 25 टक्क्यांनी घसरले आहेत.
हे आहेत सोन्याचे दर कमी होण्याचे कारण
सोन्याच्या दरांमध्ये झालेल्या घसरणीबाबत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना जळगाव शहर सराफ बाजार असोसिएशनचे सचिव स्वरूप लुंकड म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात आता परिस्थिती बदलत आहे. कोरोनामुळे मध्यंतरी अतिशय बिकट परिस्थिती होती. परंतु, कोरोनावर लस विकसित झाल्यानंतर त्याला नागरिकांचा विक्रमी प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील व्यवहार हळूहळू गतिमान होत आहेत. सोबतच अमेरिकन डॉलर घसरला आहे. अमेरिकेने व्याजदरात देखील वाढ केल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील गुंतवणूकदारांनी सोन्याच्या खरेदीऐवजी फिक्स डिपॉझिट म्हणजेच मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केल्याने सोन्याचे दर घसरत आहेत. यापुढे स्थानिक बाजारात सोन्याचे भाव हे भविष्यात 43 हजार रुपये प्रतितोळा इतके खाली येऊ शकतात, असा अंदाज असल्याचे स्वरूप लुंकड यांनी सांगितले.
सोने खरेदीला प्राधान्य
ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याचे दर घसरल्याने सोने खरेदीला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मध्यंतरी सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने सोने खरेदी मंदावली होती. पण, आता सुवर्ण बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. यापुढे देखील सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता असल्याने पुढचे काही दिवस सुवर्ण बाजारात खरेदी-विक्री संदर्भात हीच परिस्थिती कायम असेल, असाही अंदाज वर्तवला जात आहे.
चांदीचेही दर घसरले
चांदीनेही 1 हजार 400 रुपयांपेक्षा अधिक नीचांक गाठला आहे. मुंबईत चांदीचे भाव सोमवारी 70 हजार 432 रुपये प्रति किलोवर बंद झाले. शुक्रवारी चांदी 67 हजार 261 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली. म्हणजे चांदी गेल्या आठवड्यात 3 हजार 171 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
हेही वाचा - फास्टटॅगच्या सक्तीविरोधात दाखल जनहित याचिकेवर 17 मार्च रोजी सुनावणी