मुंबई - भाजपचे खासदार संभाजीराजे यांनी सर्व आरक्षण रद्द करून सर्वच घटकातल्या विद्यार्थ्यांना पदवीपर्यंत शिक्षण मोफत देण्याची मागणी ट्वीटरवर केली. यासंदर्भात भाजपचे जेष्ठ नेते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया घेतली असता, त्यांनी सर्व घटकांना मोफत शिक्षण देणे शक्य नसल्याचे सांगितले.
भारतीय संविधानाने सर्व मागास घटकांसाठी आरक्षणाचे बंधन घातले आहेत. त्याचे पालन करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने व्यवस्था चालते. समाजातल्या सर्व मागास घटकांनाही न्याय द्यायचा असतो. पण सरसकट सर्व घटकातल्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे शक्य नाही. सरकारी संस्था व्यतिरिक्त खासगी संस्थाही ज्ञानदानाचे कार्य करतात. त्या संस्था सुरळीत चालणे आवश्यक आहे. राज्य सरकारकडे पदवीपर्यंत शिक्षण मोफत देण्यासाठी एवढा निधीही उपलब्ध नाही. मोफत शिक्षणाची मागणी हे संभाजी राजे यांचे वैयक्तिक मत असल्याचे महाजन यांनी सांगितले.
दरम्यान, विद्यार्थ्यांना ९४ टक्के गुण मिळूनही इच्छित ठिकाणी प्रवेश मिळू शकत नाही. आरक्षण गेले खड्ड्यात. सर्व घटकातल्या विद्यार्थ्यांना पदवीपर्यंत मोफत शिक्षण द्या, असे ट्वीट संभाजीराजे यांनी केले आहे.