मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविश्वास प्रस्तावासंदर्भात बोलताना महाराष्ट्रात शिवसेनेने भाजप सोबतची युती तोडली होती, असे सांगितले. मात्र पंतप्रधान यांचे हे वक्तव्य अर्धसत्यच नाही तर असत्य आहे, असा दावा तत्कालीन भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी वास्तविक युती तोडण्याबाबत निर्णय जाहीर करायला हवा होता. कारण भाजप पक्षाने शिवसेनेसोबत न जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र फडणवीस यांनी ती घोषणा न करता ती जबाबदारी आपल्यावर सोपवली होती. आपण उद्धव ठाकरे यांना फोन करून कळवले होते, असा दावा खडसे यांनी केला आहे.
खडसे यांचे वक्तव्य निराधार : यासंदर्भात बोलताना भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी सांगितले की, एकनाथ खडसे हे आता विरोधात आहेत. त्यामुळे ते काहीही सांगू शकतात. त्यांनी केलेला दावा निराधार आहे. देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष असताना युती तोडण्याचे नसते धंदे यांना कोणी करायला सांगितले होते. त्यामुळे काहीतरी सांगून शेखी मिरवण्याचा खडसे प्रयत्न करीत आहेत. त्यांचा दावा निराधार आहे असे महाजन म्हणाले. वास्तविक 2014 मध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटण्याला शिवसेनेचा आडमुठेपणा कारणीभूत होता. शिवसेना 151 जागा लढवण्यासाठी ठाम होती आणि केवळ एका जागेसाठी शिवसेना युती तोडण्यापर्यंत गेली होती म्हणून युती तुटली. त्या निवडणुकीतही जनता भारतीय जनता पक्षासोबतच होती म्हणून आम्हाला 123 तर शिवसेनेला केवळ 63 जागा जिंकता आल्या असेही महाजन म्हणाले.
राहुल गांधी बालिश : राहुल गांधी यांनी आज संसदेत चर्चेदरम्यान फ्लाईंग किस महिलांकडे बघून दिल्याची चर्चा आहे. यासंदर्भात काही खासदार महिलांनी लोकसभा अध्यक्षांकडे ही तक्रार केली आहे. वास्तविक राहुल गांधी हे एका मोठ्या पक्षाचे नेते आहेत. स्वतःला ते पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणतात आणि त्यांचे वर्तन मात्र अत्यंत बालिशपणाचे असते. कधी ते मिठी मारतात, कधी डोळा मारतात तर कधी फ्लाईंग किस देतात. हे त्यांचे वर्तन कुठल्याही राजकीय नेत्याला आणि सभ्य माणसाला शोभणारे नाही, असा टोला महाजन यांनी यावेळी लगावला.
हेही वाचा -