मुंबई : तृतीयपंथीयांच्या आरोग्य विषयक समस्या आपल्या सारख्याच आहेत. पण त्याच आजारांसाठी त्यांना समाजाकडून मिळणारी वागणूक मात्र वेगळी मिळते. त्यामुळे आजारांच्या उपचारासाठी ही आपलीच भावंडे आपल्या शासकीय रुग्णालयात भरती होणे टाळतात. समजा चुकून भरती झाले तरी इतर रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक नाराज होतात. तक्रार करतात व त्यामुळे ते आजारपणातही रुग्णालयात जाणे टाळतात. त्यामुळे रुग्णालय प्रशासन सुद्धा संभ्रमित होते. म्हणूनच त्यांच्या भावना समजून घेऊन तृतीयपंथीय रुग्णांसाठी देशातील पहिला ३० बेड चा वॉर्ड मुंबईतील जीटी रुग्णालयात सुरू करण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज या वार्डच उद्घाटन करण्यात आले.
कशा पद्धतीने उपचार : जीटी रुग्णालयाच्या तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने मानक मार्गदर्शक प्रणाली बनवली. जेणेकरून एखादी तृतीयपंथी व्यक्ती उपचार घेण्यासाठी आल्यास त्यांना कसे समजून आणि सामावून घ्यायचे हे कर्मचारी व अधिकारी यांना वेळोवेळी उपयुक्त ठरेल. तसेच त्यांना आवश्यक ती रुग्णसेवा उपलब्ध होईल याची दक्षता घेतली जाईल. केस रेकॉर्ड फॉर्म मध्ये श्री, पुरुष आणि इतर असा विकल्प ठेवण्यात येणार आहे. तसेच, जन्मजात लिंग, सध्याची लैंगिक ओळख आपण कश्याप्रकारे ओळखले / संबोधले जावे. (तो / ती / ते) याची नोंद केली जाईल. व रुग्णांवर आवश्यक ते उपचार केले जातील.
देशातील पहिला ३० बेड चा वॉर्ड : ज्या तृतीयपंथीय व्यक्तीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले कार्ड नसेल तर त्यांनी स्वतः नमुना फॉर्म भरून नोंदणी विभागात किंवा अपघात विभागात माहिती द्यायची आहे. ज्या रुग्णांना भरती करण्याची गरज आहे, त्यांना टीजी वॉर्डमध्ये भरती करण्यात येईल. भरती होताना काही रक्त चाचण्या व मानसिक आरोग्य या विषयी माहिती घेतली जाईल. महात्मा फुले / प्रधान मंत्री योजने अंतर्गत नमुद केलेल्या आजारांवर उपचार केले जातील. तसेच आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करुन घेतली जाईल. वॉर्डमध्ये ३० खाटा असून विविध वैद्यकीय अनेक प्रकारच्या वैद्यकीय सेवा कक्षात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच समुपदेशक, मानसोपचार तज्ञ यांच्याकडून नियमित भेटी होतील.
पुण्यात व इतर ठिकाणी अशा पद्धतीचं वॉर्ड सुरू करणार : या वॉर्ड विषयी बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, तृतीयपंथीय हा सुद्धा समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे. बऱ्याचदा तृतीयपंथी रुग्णांना ऍडमिट करताना अनेक अडचणी येतात. त्यांच्या आरोग्याबाबत अनेक तक्रारी असतात. हे सर्व लक्षात घेऊन अशा पद्धतीचा पहिलाच देशातील ३० बेडचा वॉर्ड हा त्यांच्यासाठी जीटी हॉस्पिटलमध्ये तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये ऑपरेशन थेटर, मॉनिटर, आयसीयू अद्यावत सर्व सुविधा उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर डॉक्टर, सिस्टर व इतर कर्मचारी अशा १५० लोकांचा स्टाफ सुद्धा असणार आहे. या सर्वांचे योग्य प्रकारे कॉन्सिलिंग सुद्धा करण्यात आले आहे. त्याचबरोबर जीटी प्रमाणे पुण्यात सुद्धा व इतर ठिकाणी अशा पद्धतीचे वॉर्ड सुरू करणार असल्याचेही वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.
भारतात कुठेही अशा पद्धतीची व्यवस्था नाही : राष्ट्रीय तृतीयपंथी समितीच्या सदस्या झैनाब पटेल यांनी सुद्धा या वॉर्ड मध्ये सल्लागार म्हणून मोलाचा हातभार लावला आहे. याविषयी बोलताना त्या म्हणाला की, भारतात कुठेही अशा पद्धतीची व्यवस्था नाही आहे. तृतीयपंथीयांसाठी काही राज्यांमध्ये सुविधा आहेत. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सुविधा निर्माण करणारा महाराष्ट्रातील नाही तर देशातील हे पहिलचे रुग्णालय आहे. ते सुद्धा मुंबईमध्ये जीटी सारख्या हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीच्या सुविधा उपलब्ध होत आहेत त्या सुद्धा ३० बेडच्या ही फार मोठी गोष्ट आहे. १२ वर्षांपूर्वी झालेल्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात ५ लाख तृतीयपंथी होते. आता त्यामध्ये बरीच वाढ झाली असून ३० बेडचा हा वॉर्ड यांच्यासाठी फार कमी पडणार आहे. कारण राज्यात ५ लाख तर मुंबईमध्ये ७० हजार तृतीयपंथी आहेत व त्यामध्ये अजूनही वाढ होत आहे. म्हणूनच अशा पद्धतीचे वॉर्ड हे राज्यभर सर्वत्र करायला हवेत अशी अपेक्षा झैनाब पटेल यांनी याप्रसंगी व्यक्त केली.