मुंबई : गिरीष चौधरी यांची आज सायंकाळी कारागृहातून सुटका करण्यात येणार आहे. गिरीष चौधरी हे राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. त्यांच्यावर पुण्यात जमीन खरेदी प्रकरणी मनी लॉंड्रीन्ग केल्याचा आरोप आहे. आज झालेल्या सुनावणीवेळी त्यांना न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे.
अटीशर्तीसह जामिन मंजूर : गिरीष चौधरी तब्बल 20 महिन्यांपासून ED च्या अटकेत आहेत. त्यांच्यावर 30 मे पासून किडनी आजारावर, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. PMLA न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या न्यायालयात त्यांना अटी-शर्तीसह जामिन मंजूर करण्यात आला आहे. एक लाख रुपये जातमुचलका रक्कम गिरीष चौधरी यांनी भरली असून त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
काय आहेत अटी-शर्ती : गिरीष चौधरी यांना त्यांचा पासपोर्ट ईडीकडे जमा करणे बंधनकारक असणार आहे. तसेच दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी दुपारी 12 ते 2 या काळात चौकशीसाठी हजर राहण्याच्या बंधनकारक सूचना गिरीष चौधरी यांना देण्यात आल्या आहेत. गिरीष चौधरी यांनी तपासात सहकार्य करावे, साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये अशा अटी घालण्यात आल्या आहेत.
आज सायंकाळी होणार सुटका : आज थेट रुग्णालयातून गिरीष चौधरी यांना सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. सुनावणी झाल्यावर गिरीष चौधरी यांची आर्थर रोड कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तिथे आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत न्यायालयाचे आदेश पोहचणार आहेत. त्यानंतर गिरीष चौधरी यांची सायंकाळी 6:30 च्या आसपास सुटका होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर सेशन कोर्टाने गिरीष चौधरी यांच्या सुटकेचा निर्णय घेतला आहे.
भोसरी घोटाळा प्रकरणामध्ये तुरुंगात - माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी कथित भोसरी घोटाळा प्रकरणामध्ये तुरुंगात आहेत. त्यांनी याआधी खालच्या न्यायालयामध्ये दोनवेळा जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. मुंबई उच्च न्यायालयामध्ये देखील त्यांनी केलेला अर्ज फेटाळून लावला होता. एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षाचे आमदारअसताना त्यांच्यावर भोसरी पुणे जमीन खरेदी व्यवहारात कथित घोटाळा झाल्याचा आरोप होता. तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने शेतजमिनीबाबत गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात मुंबईच्या सत्र न्यायालयातील पीएमएलए या विशेष न्यायालयामध्ये तो खटला सुरू आहे.
हेही वाचा -