मुंबई : मुंबईत रिक्षा-टॅक्सीच्या किमान भाडेदरात १ ऑक्टोंबर पासून अनुक्रमे २ व ३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे रिक्षाचे किमान भाडे २३ तर टॅक्सीचे २८ रुपये झाले आहे. सुधारित दरानुसार मीटर सुसंगत करण्याची प्रक्रिया ( meter recalibration ) १ ऑक्टोंबर पासून सुरू झाली असून त्यासाठी दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. त्याची मुदत ३० नोव्हेंबर रोजी संपत आहे. परंतु अजूनही मुंबई फक्त ३४ टक्के मीटर रिकॅलिब्रेशनचे काम पूर्ण झाले आहे.
१ डिसेंबर पासून कारवाई? - राज्य परिवहन विभागाने रिक्षा, टॅक्सी, कॅबची भाडेवाढ १ ऑक्टोंबर रोजी घोषित केल्यानंतर त्यासाठी मीटर रिकॅलिब्रेशन करायला २ महिन्याचा अवधी दिला होता. मात्र मुंबईत आतापर्यंत फक्त ३४ टक्के वाहनांचे रिकॅलिब्रेशन झाल्याची माहिती समोर आली आहे. आता उरलेल्या या चार दिवसात मीटर रिकॅलिब्रेशन करण्याची मुदत संपणार असून १ डिसेंबर पासून रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येक वाहनाला मीटर रिकॅलिब्रेशन अनिवार्य राहणार आहे.
परवाना निलंबनाची कायद्यात तरतूद - मुंबई महानगरात सुमारे साडेपाच लाख रिक्षा ते ६० हजार अधिक टॅक्सी आहेत. या तुलनेत रिकॅलिब्रेशन करणाऱ्या केंद्रांची संख्या फारच कमी असल्याचे टॅक्सी व रिक्षा चालकाकडून सांगितले जात आहे. येत्या चार दिवसांमध्ये मुंबई महानगरातील रिक्षा, टॅक्सीचे मीटर रिकॅलिब्रेशन शक्य नसल्याचे आकडेवारीवरून सहज स्पष्ट होते. परिणामी परिवहन विभागाकडून १ डिसेंबर पासून प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी १ दिवस परवाना निलंबन करण्यात येणार असून किमान सात दिवस किंवा त्यापेक्षा जास्तीत जास्त ९० दिवस परवाना निलंबनाची तरतूद आहे. मुदत समाप्तीनंतर प्रतिदिन ५० रुपये आणि जास्तीत जास्त पाच हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे.
मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावावर विचार - याविषयी बोलताना मुंबई सेंट्रल येथील आरटीओ अधिकारी भरत कळसकर यांनी सांगितले आहे की, मीटर रिकॅलिब्रेशनचे ३४ टक्के काम पूर्ण झाले असून अजून ६६ टक्के काम प्रलंबित आहे. त्यामुळे १०० टक्के रिकॅलिब्रेशन होण्यास वाहन चालकांना मुदतवाढ देण्याचा प्रस्तावावर विचार सुरू आहे. तसे झाल्यास रिक्षा, टॅक्सी चालकांना ही शेवटची मुदतवाढ राहणार आहे. अन्यथा कठोर कारवाई केली जाणार. १ ऑक्टोंबर रोजी भाववाढ झाल्यानंतर प्रवासी आणि चालक यांच्यातील वाद टाळण्यासाठी परिवहन आयुक्तालयाने बारकोड असलेले दरपत्रक चालकांना दिले आहे. हा बारकोड स्कॅन करून प्रवाशांना दरपत्रकाची वैधता तपासली जात होती. तसेच मीटर रिकॅलिब्रेशनचे काम जलदगतीने व्हावे म्हणून ११ कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तरीसुद्धा मुंबईत मीटर रिकॅलिब्रेशनसाठी असणाऱ्या केंद्रांची संख्या कमी असल्याकारणाने त्या ठिकाणी लांबच्या लांब रांगा टॅक्सी, रिक्षाच्या लागत आहेत. त्यासाठी बराच अवधी वाया जातो. तसेच त्यामुळे धंद्यावर सुद्धा त्याचा परिणाम होतो, असे मुंबईतील टॅक्सी चालक छबिलाल जयदेव गुप्ता यांनी सांगितले आहे.