मुंबई - मुंबईत सरकारी अनुदानप्राप्त जवळपास २५ शाळा, कॉलेज बंद करुन त्या जागांचा बेकायदेशीरपणे खासगी कारणांसाठी वापर करण्याचा डाव संस्थाचालकांनी आखला असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यावर आवर घालण्याची मागणी केली आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये शालेय शिक्षणमंत्रीपद काँग्रेसकडे आलेले असताना काँग्रेसचे शालेय शिक्षण विभागात कोणी ऐकत नाही. यामुळेच काँग्रेसच्या प्रदेश कमिटीच्या एका सरचिटणीसांनी मुंबईतील अनुदानित महाविद्यालयांसंदर्भात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच तक्रार केली आहे. मुंबई आणि परिसरात अनुदानावर असलेली सुमारे २५ शाळा-महाविद्यालये ही बंद केली जात असून त्याला आवर घालावा, अशी मागणी या सरचिटणीसाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच या संस्थांनी आत्तापर्यंत सरकारी सवलती लाटल्या असून त्या संस्था या जागांचा व्यावसायिक वापर करणार आहेत. त्यामुळे त्यांना रोखणे गरजेचे असल्याचे सांगत या शैक्षणिक संस्था बंद पडू नयेत यासाठी सरकारने एक समिती नेमावी, अशी मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
एखाद्या विशिष्ट प्रकल्पासाठी जमिनीची नोंदणी करुन त्यासंदर्भातील सर्व सरकारी लाभ घेतल्यानंतर अचानक मूळ हेतू बदलता येत नाही, अशी कायद्यात तरतूद आहे. मात्र, असे असतानाही या संस्था व त्या संस्थांचे विश्वस्त बेकायदेशीरपणे सदर शैक्षणिक संस्था बंद करुन नफेखोरीसाठी त्या जागांचा वापर करू पाहत आहेत. हे थांबवावे अशी मागणीही शर्मा यांनी केली आहे.
हेही वाचा - राष्ट्रीय आरोग्य मिशन : नियुक्त्यांमध्ये 400 कोटींचा गैरव्यवहार, फडणवीसांचा आरोप