मुंबई - औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव झाल्यानंतर फक्त शहराचे नामांतर झाले की जिल्ह्याचे असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पण आता राज्य सरकारकडून याबाबत राजपत्र जारी करण्यात आले आहे. यामध्ये संपूर्ण जिल्हा आता छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव म्हणून झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
संभ्रम आता दूर - मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या औरंगाबाद व उस्मानाबाद नामकरणाला अखेर केंद्राने हिरवा झेंडा दाखवला आहे. मात्र त्यातील शब्दांचा खेळ पाहता नाव बदल शहराचा केला की पूर्ण जिल्ह्याचा असा प्रश्न निर्माण झाला होता. केंद्र सरकारने काढलेल्या पत्रकानुसार औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव असे करण्यात आले होते. त्यात जिल्हा औरंगाबाद व जिल्हा उस्मानाबाद असे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, हा संभ्रम आता दूर झाला आहे. संपूर्ण दोन जिल्ह्यांचेच नामांतरण झाले आहे.
राजकीय पक्षांचा जल्लोष : औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोन्ही जिल्ह्यात जल्लोष करण्यात आला. टीव्ही सेंटर भागात शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा पालकमंत्री संदिपान भुमरे आणि कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी कार्यकर्त्यांसह जल्लोष केला. तर दुसरीकडे उद्धव गटाच्या नेत्यांनी मात्र बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या घोषणेनंतर जवळपास 35 वर्षांनी नामकरण प्रश्नावर केंद्राने पहिल्यांदा घोषणा केली. त्यावर भाजप, शिवसेना आणि ठाकरे गटाने आनंद व्यक्त केला होती.
बाळासाहेब ठाकरे यांची मागणी : 9 मे 1988 ला बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर या नावाची घोषणा केली होती. दोन वेळा शिवसेनेच्या महापौरांनी औरंगाबाद महानगरपालिकेकडून हा प्रस्ताव पाठवला होता. मात्र, याकडे कोणीही लक्ष दिले नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला होता. याबद्दल मी केंद्र सरकारचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो, अशी प्रतिक्रिया विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. तर हे श्रेय फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आहे, असे ते यावेळी म्हणाले.
गावांना मुघल प्रशासकांची नावे: भारतावर मुघलांनी दीर्घकाळ राज्य केले होते. त्यामुळे देशातील आणि राज्यातील अनेक गावांची नावे मुघलांच्या नावावरून ठेवण्यात आलेली आहेत. यामध्ये अकबर, औरंगजेब, जहांगीर, शहाजान, बाबर यांच्या नावाचा अधिक वापर झालेला दिसतो. देशात अकबराच्या नावाने 252 गावे आणि शहरे आहेत. बाबराच्या नावाने 61 गावे आहेत. शहाजहानच्या नावाने 63 गावे आहेत. औरंगजेबाच्या नावाने 177 गावांची नावे आहेत तर जहांगीरच्या नावावर 141 गावांची नावे ठेवण्यात आल्याचे दिसून येते. मुघल प्रशासकांची नावे मुख्यत्वे उत्तर आणि मध्य भारतात अधिक गावांना दिल्याचे दिसून येते. यातील उत्तर प्रदेशात सर्वाधिक 396 गावांना मुघल प्रशासकांचे नाव आहे. बिहारमध्ये 97 गावांना मुघल प्रशासकांचे नाव देण्यात आले आहे. हरियाणामध्ये 39 गावांना मुघल प्रशासकांचे नाव आहे. महाराष्ट्र राज्यात सुमारे 50 गावांना मुघल प्रशासकांचे नाव देण्यात आलेले आहे.