मुंबई: उद्योगपती गौतम अदानी हे राज्यातील विविध नेत्यांची भेट घेत आहेत. त्यांनी आज शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
हिडेनबर्ग अहवाल आल्यानंतर अदानी ग्रुप अडचणीत आला आहे. विरोधी पक्षांनी गौतम अदानी यांची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करावी, अशी मागणी लावून धरली होती. ही मागणी केंद्र सरकारने मान्य केली नाही. त्यामुळे संसदेचे अधिवेशनाचे कामकाज व्यवस्थित होऊ शकले नाही. अनेकदा संसदेचे कामकाज ठप्प झाले होते. काँग्रेसने अदानीच्या कथित घोटाळ्यावरून देशभरातदेखील आंदोलन केली आहेत. असे असताना शरद पवार यांनी गौतम अदानी यांना जाणूनबुजून अडचणीत आणले जात असल्याचे म्हटले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
संसदीय समितीऐवजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची समितीचा आग्रह-शरद पवार यांनी गौतम अदानी यांच्या चौकशी विरोध नसल्याचे सांगत सारवासारव केली. प्रत्यक्षात संसदेच्या समितीकडून चौकशी करण्याऐवजी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी केली. जर संसदेच्या समितीकडून चौकशी केली तर त्याचा परिणाम होणार आहे. कारण, सत्ताधाऱ्यांचे संसदेच्या समितीमध्ये बहुमत आहे, असा दावा शरद पवार यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर अदानी-पवार यांची आजची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
काय म्हणाले होते शरद पवार? 'आमच्या सहकारी पक्षांचे संसदीय चौकशीबाबतचे मत आमच्यापेक्षा वेगळे आहे. पण आम्हाला एकता टिकवून ठेवायची आहे. मी जेपीसीवर माझे मत मांडले. परंतु जर आमच्या सहकाऱ्यांना ते आवश्यक वाटत असेल तर आम्ही विरोध करणार नाही. त्यांच्याशी सहमत नसताना विरोधी एकजुटीसाठी आम्ही विरोधही करणार नाही. जेपीसीवरील पवारांच्या टीकेवरून काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले, की जेपीसीबाबत राष्ट्रवादीचे मत वेगळे असू शकते. परंतु 19 समविचारी पक्षांना जेपीसीची आवश्यकता वाटते. कारण, पंतप्रधान आणि अदानींचा संबंध हा मुद्दा सत्य असल्याचेही त्यांनी म्हटले होते.