मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सातत्यपूर्ण जनजागृतीचा सकारात्मक परिणाम म्हणून महानगरपालिका क्षेत्रात जलजन्य आजारबाधितांच्या संख्येत गेल्या 6 वर्षांत लक्षणीय घट झाली आहे. हेपॅटायटीस रुग्णसंख्येत 83.60 टक्के तर गॅस्ट्रो रुग्णांच्या संख्येत 68 टक्के घट झाली आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार यंदा बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील जलजन्य आजारांच्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या 11 महिन्यांच्या कालावधीचा तुलनात्मक अभ्यास केला असता वर्ष 2019च्या तुलनेत वर्ष 2020मध्ये जलजन्य आजार असणाऱ्या हेपॅटायटीस ‘ए’ व ‘ई’ रुग्णसंख्येत तब्बल 83.60 टक्क्यांची, तर गॅस्ट्रो बाधितांच्या संख्येत 68.04 टक्क्यांची नोंद झाली.
कोरोनाबाबतही जनजागृती -
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात जलजन्य आजारांबाबत दरवर्षी सातत्यपूर्ण जनजागृती केली जाते. याच जोडीला यंदा कोविड प्रतिबंधाबाबत देखील जनजागृती नियमितपणे करण्यात येत आहे. याअंतर्गत प्रामुख्याने सातत्याने हात धुणे, उघडयावरचे अन्न न खाणे, कटाक्षाने शुद्ध पाणी पिणे आदीबाबींचा समावेश आहे. या जनजागृती प्रयत्नांना नागरिकांनी देखील अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळेच गेल्यावर्षी म्हणजेच जानेवारी ते नोव्हेंबर या दरम्यान 1 हजार 494 एवढी असणारी हेपॅटायटीस ‘ए’ व ‘ई’ रुग्णसंख्या यंदा म्हणजेच जानेवारी ते नोव्हेंबर याच 11 महिन्यांच्या कालावधीत 245 इतकी झाली आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत हेपॅटायटीस रुग्णसंख्येत तब्बल 83.60 टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. हेपॅटायटीस ‘ए’ व ‘ई’ रुग्णसंख्या ही जानेवारी ते नोव्हेंबर 2015 या दरम्यान 1 हजार 75 एवढी होती. याच 11 महिन्यांच्या कालावधीसाठी ही रुग्णसंख्या सन 2016मध्ये 1 हजार 425, वर्ष 2017मध्ये 1 हजार 105, 2018मध्ये 1 हजार 74 एवढी नोंदविण्यात आली होती.
गॅस्ट्रो रुग्णसंख्येत 68.04 क्क्यांची घट -
जलजन्य आजार असणाऱ्या गॅस्ट्रो रुग्णांच्या सख्ंयेत देखील गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय घट नोंदविण्यात आली आहे. गेल्यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या 11 महिन्यांच्या कालावधी दरम्यान 7 हजार247 रुग्ण आढळले होते. तर यंदा जानेवारी ते नोव्हेंबर या दरम्यान 2 हजार 316 रुग्ण आढळले. गेल्यावर्षीच्या तुलनेत गॅस्ट्रो रुग्णसंख्येत तब्बल 68.04 टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. गॅस्ट्रो रुग्णसंख्या ही जानेवारी ते नोव्हेंबर 2015 या दरम्यान 10 हजार 257 एवढी होती. याच 11 महिन्यांच्या कालावधीसाठी सदर रुग्णसख्ंया सन 2016 मध्ये 9 हजार 462, वर्ष 2017 मध्ये 7 हजार 911, सन 2018 मध्ये 7 हजार 315 एवढी नोंदविण्यात आली होती.
एकूण रुग्णसख्ंयेत 70.70 टक्क्यांची घट -
हेपॅटायटीस ‘ए’ व ‘ई’ आणि गॅस्ट्रो या दोन्ही जलजन्य आजारांच्या उपलब्ध आकडेवारीचा एकत्रित विचार करावयाचा झाल्यास जानेवारी ते नोव्हेंबर 2019 दरम्यान 8 हजार 741 रुग्ण आढळून आले होते. तर याच कालावधीसाठी यंदाच्या वर्षी म्हणजेच जानेवारी ते नोव्हेंबर 2020 दरम्यान 2 हजार 561 रुग्ण आढळून आले आहेत. याचाच अर्थ गेल्यावर्षीच्या तुलनेत जलजन्य आजारांच्या रुग्णसख्ंयेत 70.70 टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे.
पालिकेचे प्रयत्न -
बृहन्मुंबई महानगरपालिका जलजन्य आजारांचे प्रमाण कमीतकमी व्हावे, यासाठी देखील नियमितपणे प्रयत्न करत असते. यामध्ये प्रामुख्याने पुरविण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता राखण्यासोबतच सातत्याने करण्यात येणाऱ्या जनजागृतीचाही समावेश असतो. त्याचबरोबर कोविडच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात कोविड प्रतिबंध विषयक जनजागृती देखील अत्यंत प्रभावीप्रणे करण्यात आली. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत सहकार्य केले.