मुंबई - कोरोनाने महाराष्ट्रासह मुंबईत मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. याच पार्श्वभूमीवर वडाळा येथील राम मंदिर येथे साजरा होणारा गणेशोत्सव यंदा रद्द करण्यात आला आहे. आता हा गणेशोत्सव पुढच्या वर्षी माघी गणेश जयंतीला साजरा करण्याचा निर्णय जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव समितीने घेतला आहे.
गणेशोत्सव काळात गणेशभक्त मोठ्या प्रमाणात वडाळा जीएसबीच्या गणपती मंडळाला भेट देत असतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने मंडळाने गणेशोत्सव फेब्रुवारी 2021 रोजी माघी गणेश चतुर्थीला साजरा करण्याचा निर्णय घेतला. मंडळाचे सचिव मुकुंद कामत यांनी याबद्दलची माहिती दिली. यंदा मंडळाचे 65 वे वर्ष आहे. मात्र, मुंबईत कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. अशात सरकारला सहकार्य करण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे कामत यांनी सांगितले.