मुंबई Ganesh Festival 2023 : सध्या गणेश उत्सवाचा देशाच्या आर्थिक राजधानीत मोठा जल्लोष सुरू आहे. मुंबईतील भायखळा इथलं मकबा चाळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ मागील 25 वर्षापासून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती साकारत आहे. यावर्षी या गणेश उत्सवात ( Ganesh Festival ) शेतकऱ्यांच्या व्यथेवर प्रकाश टाकत नाचणी, बाजरी, ज्वारी व मका या धान्यांपासून बाप्पाची सुंदर मूर्ती घडवली आहे. मकबा चाळ गणेश मंडळानं बनवलेला हा देखावा पाहण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत.
शेतकऱ्यांच्या व्यथेवर आधारित देखावा : विघ्नहर्ता गणपती बाप्पाचं आगमन गणेश चतुर्थीच्या दिवशी झालं आहे. गणेश उत्सवाच्या निमित्तानं मुंबई व महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी गणपती बाप्पाच्या उत्सवाचा जल्लोष सुरू आहे. गणेश उत्सवात पर्यावरण पूरक गणपती बाप्पाची मूर्ती व सामाजिक प्रबोधनाचे संदेश देणारे देखावे अनेक सार्वजनिक गणेश मंडळात पाहायला मिळतात. मुंबई, भायखळा इथल्या मकबा चाळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ त्यापैकीच एक आहे. या मंडळाचं हे 57 वं वर्ष असून मागील 25 वर्षापासून हे मंडळ सातत्यानं पर्यावरण पूरक गणेशाची मूर्ती व सामाजिक प्रबोधन देणारे देखावे साकारत आलं आहे.
पर्यावरण पूरक गणेशाची मूर्ती : यंदा राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळाचं सावट आहे. तर अनेक ठिकाणी अतिवृष्टीनं शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. शेतकरी कर्जबाजारी झाल्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाणही वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी मकबा चाळ मंडळानं नाचणी, बाजरी, ज्वारी व मका या धान्यांपासून पर्यावरण पूरक गणेशाची मूर्ती बनवत सुंदर देखावा साकारला आहे.
42 किलो धान्यापासून बनवली मूर्ती : मकबा चाळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळानं यंदा नाचणी, बाजरी, ज्वारी व मका या धान्यांपासून पर्यावरण पूरक 8 फुटांची बसलेली गणेशाची मूर्ती साकारली आहे. यासाठी 42 किलो धान्याचा वापर करण्यात आला आहे. या मूर्तीला बनवण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागला आहे. 'मागील 25 वर्षापासून आम्ही पर्यावरण पूरक गणेशाची मूर्ती व सामाजिक प्रबोधनाचे देखावे तयार करत आलो आहोत. यापूर्वी खडू, पेन्सिल, भुईमुगाच्या शेंगा, शिंपले, तांदूळ तसेच चंदनाचं लाकूड यापासून गणपतीची मूर्ती साकारली' अशी माहिती मंडळाचे कार्यकर्ते विपुल शेट्ये यांनी दिली आहे. यंदा शेतकऱ्यांचा प्रश्न जटिल झाला असून सर्वच बाजूंनी शेतकरी हवालदिल झाला आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी, शेतमालाला योग्य भाव न भेटणं, शेतकऱ्यांची कर्जबाजारी व या सर्व मानसिकतेतून केली जाणारी आत्महत्या या कारणास्तव यंदा मंडळानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखावा साकारण्याचं ठरवलं. तशा पद्धतीनं पर्यावरण पूरक गणपतीची मूर्ती व देखावा साकारण्यात आला असल्याचं विपुल शेट्ये यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा :