मुंबई- केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि सीएए, एनआरसीमुळे देशात एक वेगळे वातावरण निर्माण झाले आहे. जनता भयभीत झाली आहे. अशा स्थितीत देशाला राजकीय दिशा देण्याची गरज आहे. ती दिशा देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार करत आहेत. म्हणूनच आज मुंबईत 'महात्मा गांधी शांती यात्रेची' सुरूवात ही त्यांच्या हस्ते झाली, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक म्हणाले.
हेही वाचा- जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर.. पाहा, कोण आहेत तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री ?
गेट वे ऑफ इंडिया येथे सकाळी यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली गांधी शांती यात्रेला सुरूवात झाली. त्यानंतर मलिक यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना ही माहिती दिली. मलिक पुढे म्हणाले की, देशाात एक वेगळे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे देशाला एकसंध ठेवण्यासाठी लोकांमध्ये संदेश गेला पाहिजे. त्याची सुरुवात ही ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी केली असून त्याला देशभरातून पाठिंबा मिळणार असल्याचेही मलिक म्हणाले.
आज ज्या प्रकारे उत्तर प्रदेशात हत्या केल्या जात आहेत. जेएनयू सारख्या विद्यापीठात विद्यार्थ्यांवर हल्ले केले जात आहेत. अशा काळात देशातील जनतेला आणि विविध राजकीय पक्षांनाही राजकीय दिशा देणाऱ्या नेत्याची गरज आहे. ती दिशा केवळ शरद पवार हे देवू शकतात, असेही मलिक म्हणाले.