मुंबई - मुंबईत पुढील आठवड्यात वॉर्डनुसार लसीकरणाचे कॅम्प सुरू करण्याचा विचार सुरू आहे. ज्यामधून 70 हजार लोकांचे लसीकरण करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न राहणार आहे. मुंबईतील लसीकरणाबाबत नुकतीच आमची पालिका आयुक्तांसोबत बैठक झाली, ज्यामध्ये त्यांनी ही माहिती दिल्याचे मुख्य न्यायमूर्तीं दिपांकर दत्ता यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांना घरी जाऊन लसीकरण करण्यासंदर्भात हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल झाली. त्यावरील सुनावणीदरम्यान ही बाब समोर आली आहे.
परदेशात अनेक ठिकाणी घरोघरी जाऊन लसीकरण सुरू करण्यात आले आहे. भारतातही केंद्र सरकारने किमान ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सुविधा सुरू करायला हवी होती. जेणेकरून लसीकरणासाठी बाहेर पडलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कोरोना होण्याचा धोका कमी झाला असता. मुंबई महापालिकेने खासगी कामाच्या ठिकाणी आणि गृहनिर्माण संस्थांमध्ये लसीकरण करण्यास परवानगी दिली आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सध्या मुंबईतील खासगी रुग्णालय, सरकारी रुग्णालय, आणि पालिकेने सुरू केलेल्या लसीकरण केंद्रांमध्येच नागरिकांना लस दिली जात आहे, परंतु आता मुंबईतील खासगी सोसायट्या आणि खासगी कंपन्यांमध्येही लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पालिकेने लसीचा साठा विचारात घेऊन खासगी रुग्णालयांना सोसायट्यांच्या आवारात लसीकरण मोहीम सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र यासाठी काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या मार्गदर्शन सूचना लसीकरणादरम्यान प्रत्येक रुग्णालयांना पाळणे बंधनकारक असणार आहे.
हेही वाचा -'कोरोना संकटात केंद्र व राज्यांनी काहीही लपवू नये'