मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान 21 ऑक्टोबरला होणार आहे. मतदानाचा दिवस जस-जसा जवळ येत आहे. तसा-तसा उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचलेला पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत राज्यात 288 जागांवर मतदान होणार असून यावेळी राज्यात 4 माजी पोलीस अधिकारी या विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावत आहेत.
मुंबईतील मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून निवृत्त एसीपी समशेर खान पठाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर हाय प्रोफाईल निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरळी विधानसभा मतदारसंघातून वंचित आघाडीकडून माजी निवृत्त पोलीस अधिकारी गौतम गायकवाड हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच एनकाउंटर स्पेशलिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना मीरा-भाईंदर मतदारसंघातून शिवसेनेतर्फे तिकीट मिळाले आहे. तर नंदुरबार मधील शहादा मतदारसंघातून माजी निवृत्त पोलीस अधिकारी राजेश पाडवी यांना भाजपने निवडणुकीचे तिकीट दिले आहे.
हेही वाचा - महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मतदार माझ्या पाठीशी - महापौर विश्वनाथ महाडेश्वर
महाराष्ट्र पोलीस खात्यात 35 ते 40 वर्ष सेवा दिल्यानंतर पोलिसांच्या व्यथा मांडण्यासाठी आपण निवडणूक लढवत असल्याचं समशेर खान पठाण या माजी पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. पोलिसांच्या घरांचा प्रश्न हा नेहमीच दुर्लक्षित राहिलेला आहे निवडून आल्यानंतर पोलिसांच्या घरांसाठी आपल्याकडे ब्ल्यू प्रिंट तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - महाजनादेश यात्रेनंतर मुख्यमंत्र्यांची 'मुंबई चाले भाजपासोबत' प्रचाराला सुरुवात
वरळी विधानसभा मतदारसंघातील वंचित आघाडीचे उमेदवार गौतम गायकवाड या माजी पोलीस अधिकाऱ्यांनी आपण पोलीस खात्यात दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी ही निवडणूक लढत असल्याचे सांगितले आहे. पोलीस खात्यातील अनुभव आपल्या कामाला येणार असून, आपण जोमाने निवडणुकीच्या प्रचाराला लागल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - मुंबईच्या ग्रँट रोड परिसरातील आदित्य आर्केडला भीषण आग, अग्निशमनचे २ जवान जखमी