मुंबई - मुलुंड पश्चिम विनानगर येथील अॅपेक्स रुग्णालयाच्या जनरेटरला आग लागल्याची घटना काल रात्री घडली होती. या घटनेमुळे प्रसंगावधान दाखवत रुग्णालयातील सर्व रुग्णांना विविध रुग्णालयात हलवण्यात आले होते. यातील फोर्टीस रुग्णालयात हलवण्यात आलेल्या दुसऱ्या रुग्णाचा सुद्धा मृत्यू झाला आहे. विरेंद्र सिंग (वय ५५) असे या रुग्णाचे नाव असून, त्यांना रात्री ऑक्सिजन अभावी फोर्टीसला हलवण्यात आले. त्यामुळे, त्यांचा पल्स रेट कमी होऊन त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती फोर्टीसच्या डॉक्टरांनी दिल्याचे कुटुंबाने सांगितले.
दुर्घटनेनंतर विरेंद्र सिंग यांना फोर्टिस रुग्णालयात हलवण्यात आले होते. परंतु, त्यांची कुठलीही माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली नव्हती. अखेर व्हेंटिलेटरवरच्या रुग्णांना फोर्टीस रुग्णालयात हलवल्याचे कळाल्यावर कुटुंब तेथे दाखल झाले. त्यानंतर आज सकाळी आठ वाजता फोर्टिस रुग्णालयातील डॉक्टरांनी विरेंद्र सिंग यांना मृत घोषित केले.
विरेंद्र यांना अॅपेक्स येथून फोर्टीस रुग्णालयात हलवण्यात उशीर झाला होता. त्यांना ऑक्सिजन अभावी फोर्टीस रुग्णालयात नेण्यात आले. या कारणांमुळे त्यांचा पल्स रेट कमी झाला आणि त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती विरेंद्र सिंग यांचा मुलगा सुरज सिंग याने दिली. तसेच, फोर्टीस रुग्णालयाचे एक दिवसाचे १ लाख ७० हजार एवढे बिल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. आता हे बिल भरायचे कसे, असा प्रश्न सिंह कुटुंबीयांसमोर उपस्थित झाला आहे. या प्रकरणाकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
हेही वाचा- मुंबईकर मास्क लावत नसल्याने दंडाच्या रक्कमेत दुप्पट वाढ, आता ४०० रुपये दंड!