मुंबई - सार्वजनिक बांधकाम मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्यानंतर सोमवारी त्यांनी मुंबईत उपचारासाठी येण्याकरता एअर ॲम्ब्युलन्सची सोय केली होती. परंतु, या एअर ॲम्ब्युलन्स कंपनीकडून दिरंगाई झाल्याने शेवटी चव्हाण यांनी बाय रोड बारा तास प्रवास करून अखेर मुंबई गाठले.
चव्हाण यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मुंबईत उपचार घेण्यासाठीचा सल्ला त्यांच्या खासगी डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे सोमवारी सकाळी ते नांदेडहून एका खासगी एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला पोहोचणार होते. परंतु, ऐन वेळी या कंपनीकडून खूप दिरंगाई करण्यात आली. त्यामुळे शेवटी चव्हाण यांनी नांदेड ते मुंबईपर्यंतचा प्रवास बाय रोड केला. रविवारी सायंकाळी चव्हाण यांनी मुंबईला येण्यासाठी खासगी कंपनीच्या एका एअर ॲम्ब्युलन्सची नोंदणी केली होती. परंतु, चव्हाण कोरोना पॉझिटिव्ह असल्याने या ॲम्ब्युलन्सचे पायलट आणि इतर कर्मचारीही बाधित होतील अथवा त्यांना पंधरा दिवस क्वारंटाइन व्हावे लागेल. यामुळे कंपनीचे खूप मोठे नुकसान होईल, असा दावा करत कंपनीने सोमवारी सकाळी आपल्या नियोजित वेळेत ही ॲम्ब्युलन्स नांदेडपर्यंत पाठवली नव्हती.
तर, दुसरीकडे यासाठी मंत्रालयातून काही अधिकाऱ्यांनी नांदेड ते मुंबई अशा एअर ॲम्ब्युलन्सच्या प्रवासाला परवानगी देण्यास टाळाटाळ केल्यानेही चव्हाण यांना मुंबईसाठी येण्यास उशीर होत होता. यामुळे चव्हाण यांनी या एअर ॲम्ब्युलन्सची वाट न पाहता नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयातील साध्या ॲम्ब्युलन्सने मुंबईपर्यंत प्रवास केला. तब्बल १२ तासाचे अंतर कापून ते सोमवारी रात्री अकराच्या सुमारास मुंबईत पोचले. त्यांच्यावर आता ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती निकटवर्तीयांकडून देण्यात आली.