सातारा - कराड येथे स्व. सौ. वेनुताई चव्हाण स्मृती सभागृहात विकासाचे अतुल पर्व या डॉ. अतुल भोसलेंच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्तिकेचे प्रकाशन सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना 'भाजपमध्ये नाना आले आहेत, ऑक्टोबरनंतर बाबाही येतील' असे भाकीत केले.
काही महिन्यांपूर्वी सातारा जिल्ह्यात काँग्रेसचा एकही नेता शिल्लक राहणार नाही, असे मी सांगितले होते, आज ते खरे ठरताना दिसत आहे. सध्या काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री यांचे कट्टर कार्यकर्ते आमदार आनंदराव पाटील हे भाजपच्या वाटेवर आहेत. तर, ऑक्टोबरनंतर त्यांचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही भाजपमध्ये येतील, असा विश्वास चरेगावकर यांनी बोलताना व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीदरम्यान एका राजकीय चर्चेत सातारा जिल्ह्यात काँग्रेसला एकही नेता राहणार नाही, असे वक्तव्य मी केले होते. काही कार्यकर्त्यांनी काल-परवा आमदार आनंदराव पाटील यांच्या भाजप प्रवेश याबाबतच्या चर्चेनंतर मला या वक्तव्याची आठवण करून देत हे खरे झाल्याचे सांगितले. आज या ठिकाणी मी आणखीन एक धाडसी भविष्यवाणी करतो. 'भाजपमध्ये नाना आले आहेत, ऑक्टोबरनंतर बाबाही येतील' कारण सर्वसामान्य जनतेला आता विश्वास निर्माण झाला आहे, असेही ते म्हणाले.