मुंबई : मुंबई महापालिकेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. लग्नाच्या वाढदिवशीच त्यांचा मृत्यू झाला आहे. विश्वनाथ महाडेश्वर यांनी शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले होते. तसेच ते स्थायी समितीचे सदस्य होते. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव झाला होता. सेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांची बंडखोरी त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्या होत्या.
दिवंगत माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर मागील दोन दिवस कोकण दौऱ्यावर गेले होते. रायगड येथील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेलाही हजेरी लावली होती. दोन दिवसांच्या दगदगीनंतर मुंबई परतल्यावर सोमवारी त्यांच्या छातीत दुखू लागले. मनपाच्या केईएम रुग्णालयात जाऊन उपचार करून घरी गेले. परंतु, मध्यरात्री 2 वाजता हृदयविकाराचा झटका आल्याने वयाच्या 63 व्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी सांताकृझ पूर्व, पटेल नगर सर्विस रोड येथील राजे संभाजी विद्यालयात दुपारी 2 वाजता ठेवण्यात येईल. त्यांनंतर दुपारी 4 वाजता टीचर्स कॉलोनी येथील स्मशान भूमीच्या दिशेने अंत्ययात्रा निघणार आहे. वांद्रे विधानसभा मतदार संघात महाडेश्वर यांची वेगळी छाप होती. त्यांच्या निधनाने ठाकरेंच्या सेनेत मोठी पोकळी निर्माण झाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
आज लग्नाचा वाढदिवस- विश्वनाथ महाडेश्वर यांच्या पाश्चात्य माजी नगरसेविका पूजा महाडेश्वर आणि दोन मुले आहेत. माजी महापौर महाडेश्वर यांच्या लग्नाचा आज वाढदिवस होता. रात्री 12 वाजता त्यांनी पत्नी पूजा महाडेश्वर यांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मध्यरात्री 2 वाजता त्यांचे आकस्मिक निधन झाले. ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या वांद्रे विधानसभा मतदार संघातील नेते, शिवसेनेचे खंदे समर्थक, अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि ठाकरेंचे विश्वासू अशी त्यांची ओळख होती. माजी महापौर महाडेश्वर यांच्या निधनाने शिवसैनिकांकडून शोक व्यक्त केला जात आहे.
अशी होती कारकीर्द- माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी शिक्षण समितीचे अध्यक्ष ते स्थायी समितीचे ते सदस्य म्हणून देखील काम केले आहे. 2002 बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक म्हणून निवड निवडणूक आले होते. मध्ये 2003 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष झाले. 2007, 2012, 2017 मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आले. 2017 मध्ये महानगरपालिकेच्या महापौरपदी त्यांची वर्णी लागली. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून महाडेश्वर यांनी निवडणूक लढवली. शिवसेनेत बंडखोरी झाल्याने त्यांचा पराभव झाला होता.
शिंदे गटाने दिली होती अप्रत्यक्ष ऑफर- मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे 22 मार्च रोजी सायंकाळी विधानभवनात पोहोचले. त्या ठिकाणी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी महाडेश्वर यांच्या हातात हात जाऊन मिळविला. महाडेश्वर यांच्या उजव्या हातावर एक छोटी पांढरी रंगाची पट्टी चिटकवली होती. त्याविषयी गोगावले यांनी विचारणा केली. तेव्हा महाडेश्वर यांनी रक्ताची चाचणी केल्याचे सांगितले. ही संधी न दवडता भरत गोगावले यांनी विश्वनाथ महाडेश्वर यांनी शिंदे गटात येण्याची ऑफर केली.
उद्धव ठाकरे यांना अखेरपर्यंत साथ- भरत गोगावले म्हणाले, की आमच्याकडे या. तुमचा रक्तदाब व मधुमेह हे आजारपण निघून जाईल. आम्ही कसे ठणठणीत आहोत, हे पाहा. ते ऐकून विश्वनाथ महाडेश्वर यांनादेखील हसू आवरले नाही. उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना व कार्यकर्त्यांना अनेक अग्निपरीक्षांना सामोरे जावे लागत आहे. अशात ही अग्नी परीक्षा नको असेल तर आमच्यासोबत या, असेच गोगावले यांनी त्यांना सुचवले. याचाच अर्थ शिंदे गटासोबत आल्यावर तुम्हाला कुठलाही त्रास राहणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. मात्र, विश्वनाथ महाडेश्वर यांनी अखेरपर्यंत उद्धव ठाकरे यांची साथ दिली.
विश्वनाथ महाडेश्वर यांची अशी राहिली कारकीर्द
- 2002 - बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक म्हणून निवड
- 2003 - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून निवड
- 2007 - बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आले.
- 2012 - बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आले.
- 2017 - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड.