मुंबई - देशात आज घडीला पहिलीपासून ते बारावीपर्यंतचे एकत्र शिक्षण देणाऱ्या शाळांची संख्या केवळ ५ टक्के इतकीच आहे. तसेच आठवीनंतर २० टक्के मुले कायमची शाळा सोडत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष 'चाईल्ड राईट अँड यू' (क्राय) या संस्थेने काढले आहेत. त्यासाठी त्यांनी देशातील अनेक राज्यात जाऊन आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीचा संदर्भ देत सरकारला अनेक शिफारसीही सूचवल्या आहेत.
'क्राय'ने नुकतेच महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, आंध्रप्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश आदी १४ राज्यातील ग्रामीण भागात जाऊन 'आमच्या सरकारकडून अपेक्षा'; भारतातील मुलांचा आवाज नावाचे एक सर्व्हेक्षण केले. त्यात त्यांनी १ हजार ९३ विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसोबत चर्चा करून त्यांच्या मुलाखती घेतल्या. यात ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण आणि आरोग्याच्या संदर्भात काय वाटते? यासाठीचे प्रश्न विचारले. त्यानंतर देशातील आणि राज्यातील शिक्षणाचे भीषण वास्तव समोर आले, अशी माहिती क्रायच्या सहसंचालिका एस. अनुजा दिली.
देशातील प्रत्येक मुलांनी आम्हाला चांगल्या शिक्षणासाठी सरकारने उपाययोजना कराव्यात, चांगले शिक्षक द्यावेत आदी अनेक अपेक्षा केल्या आहेत. चांगले आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सरकारी शाळांची संख्या वाढवली पाहिजे. तसेच देशात सध्या बालमजुरीचा प्रश्न हा दलित, आदिवासी, भटके-विमुक्त आदी उपेक्षित घटकातील प्रश्न असून त्यांच्या शिक्षणासाठी अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे मुलांनी म्हटले. देशातील सर्वच राज्यांमध्ये सरकारी शाळांत इंग्रजीच्या शिक्षकांचा जटील प्रश्न आहे. सातवी ते आठवीच्या दरम्यान, चांगली इंग्रजी शिकवतील असे शिक्षक नसल्याने आम्ही चांगले यश मिळवू शकत नसल्याचेही मुलांनी म्हटले. तर दुसरीकडे स्थानिक भाषांसोबत हिंदीही शिकली पाहिजे, तसेच प्रत्येक शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल पद्धतीने शिक्षण मिळाले पाहिजे, अशी अपेक्षाही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
यावेळी विद्यार्थ्यांनी आम्हाला संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे, मात्र ते मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. देशातील शाळांमध्ये मुलांना येणाऱ्या अडचणींची सोडवणूक केली जाईल, अशी एकही यंत्रणा आणि त्यासाठीचा आवाज कोणी ऐकेल असे एखादे व्यासपीठ असावे, असेही मुलांनी क्रायकडे सांगितले आहे.
'हे' आहे शिक्षणाचे वास्तव
- देशातील एक तृतियांशपेक्षाही कमी शाळांमध्ये संगणक आहेत, मात्र त्यासाठी तज्ज्ञ शिक्षक नाहीत
- अजूनही २० टक्के मुले आठवीनंतर शिक्षण सोडून देतात.
- देशातील दोन तृतियांशपेक्षाही कमी मुले आपले शालेय शिक्षण पूर्ण करतात.
- देशातील ८० टक्के शाळांमध्ये मुलांच्या प्रमाणात शिक्षकांची पूर्तता नाही तर दुसरीकडे १९ टक्के शिक्षकांकडे त्या-त्या विषयांचे ज्ञान आणि योग्यता नाही.