मुंबई - श्रमिक एक्सप्रेस व्यतिरिक्त रेल्वे मंत्रालयाकडून चालवण्यात येणाऱ्या 200 विशेष गाड्यांपैकी पश्चिम रेल्वे मार्गावरच्या मुंबई सेंट्रल स्थानकातून आज(सोमवारी) पहिली विशेष रेल्वे अहमदाबादला रवाना झाली. यावेळी प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव झळकत होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी अडकून पडलेल्या परप्रांतीय मजुरांचे हाल होऊ लागले होते. अखेर त्यांना मूळगावी परतता यावे याकरता सरकारने उपाययोजना करत विशेष श्रमिक रेल्वे सुरू केल्या. त्याच पार्श्वभूमीवर आज मुंबईवरून गुजरातच्या अहमदाबादकडे आज पहिली रेल्वे मार्गस्थ झाली.
मुंबई सेंट्रल स्थानकावरुन आज पहिली विशेष रेल्वे सोडण्यात आली. यावेळी रेल्वे स्थानकावर ऑटोमॅटिक थर्मल स्कॅनरमधून प्रवाशांची तपासणी करण्यात आली. प्रवाशांनी तेथून प्रवेश करताच त्यांचे फोटो तेथे असलेल्या टीव्हीवर शरीराच्या तापमानासह झळकत होते. मुंबई सेंट्रल स्थानकावरील प्रतिक्षा कक्षात देखील प्रवाशांनी सामाजिक अंतर ठेवून बसल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, पश्चिम रेल्वेवर 17 विशेष एक्सप्रेस गाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यातील 8 गाड्या या मुंबईतून धावतील.