नवी मुंबई Fire in Taloja MIDC : नवी मुंबई परिसरातील तळोजा औद्योगिक वसाहतीमधील पडघे गावाच्या हद्दीतील केमस्पेक केमिकल्स लि. कंपनीला गुरुवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. सुदैवानं या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, लांबच्या अंतरावरुन आगीचे लोट दिसत होते. या आगीचे भीषण स्वरुप लक्षात घेता पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी वेळीच दाखल झाल्या. यानंतर रात्री उशिरापर्यंत या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर मध्यरात्री तीनच्या सुमारास आग विझविण्यात यश आले.
आगीचं कारण अस्पष्ट : पनवेल महापालिका हद्दीतील तळोजा औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या पडघे गावातील प्लॉट नं. 3 सी या ठिकाणी असलेल्या केमस्पेक केमिकल्स लिमिटेड कंपनीमध्ये फार्मा आणि सौंदर्यप्रसाधन बनविण्यासाठी लागणारं केमिकल बनविण्यात येते. या कंपनीत रात्री उशिरा अचानक आग लागली. मात्र ही आग कशी लागली हे कारण मात्र अजूनही समजलं नाही. या आगीची माहिती मिळताच तळोजा औद्योगिक वसाहत, कळंबोली, खारघर, पनवेल, सिडको येथील अग्नीशमन दलाच्या गाड्या त्वरित घटनास्थळी पोहोचल्या होत्या.
कामगार वेळीच बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला : गुरुवारी रात्री कंपनीत कामगारांचं नेहमीप्रमाणं काम सुरू होतं. त्याचवेळी अचानक कंपनीच्या पावडर प्लांटला आग लागली. ही छोटी मोठी आग असेल म्हणून कामगारांनी ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र केमिकल कंपनी असल्यानं आग लगेच पसरू लागली. आगीची तीव्रता पाहता या कंपनीतील कामगार वेळीच कंपनीबाहेर पडले. हे कामगार वेळीच बाहेर पडल्यानं सुदैवाने जीवित हानी झाली नाही. आगीनं होणारा मोठा अनर्थ टळला.
काही मिनीटांत संपूर्ण कंपनी जळून खाक : तळोजा परिसरात केमिकल कंपनीला लागलेल्या आगीवर रात्री उशीरापर्यंत नियंत्रण मिळविण्याचं काम अग्निशमन दलाचे जवान करत होते. या आगीमुळं संपूर्ण परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते. त्याचबरोबर कंपनीतीतून बॉम्ब फुटल्यासारखं आवाज येत होते. या आगीमुळं कामगार व ग्रामस्थ यांच्यात मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण पसरलंय.
हेही वाचा :