मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेला (आयडॉल) विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) शैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे आयडॉलमधील आत्तापर्यंत रखडलेल्या प्रथम वर्षाचे प्रवेश लवकरच सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नॅक मूल्यांकन आणि इतर विविध विषयामुळे यूजीसीने यंदा मान्यता रखडली होती. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे प्रवेश अडचणीत सापडले होते. यामुळेच प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रियाही सुरू करण्यात आली नव्हती. मात्र आता उशिरा का असेना यूजीसीने ही मान्यता दिली असल्याने लवकरच प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला आयडॉलमध्ये सुरुवात होणार आहे.
यूजीसी-डीईबीने शैक्षणिक वर्ष 2020-21साठी भारतातील 33 विद्यापीठांना प्रथम वर्षाचे प्रवेश सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यासाठीचे पत्र नुकतेच यूजीसीने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. या पत्रानुसार मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेलाही शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी प्रवेश करण्यास मान्यता मिळाली आहे. यामुळे आयडॉलच्या प्रथम वर्ष बीए, बीकॉम, बीएसस्सी आयटी या पदवी स्तरावरील अभ्यासक्रमासाठी, तर एम. ए. भाग 1, एम. ए. शिक्षणशास्त्र, एम. कॉम., एम.एस्सी. गणित, एम.एस्सी. आयटी, एम.एस्सी. या पदव्यूत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश लवकरच सुरू केले जाणार आहेत. यूजीसीने मागील वर्षी 15 अभ्यासक्रमांना मान्यता दिली होती. त्यानुसार मागील वर्षी जुलैच्या सत्रामध्ये 67 हजार 237 तर जानेवारीच्या सत्रांमध्ये 920 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते. 2020-21 या शैक्षणिक वर्षात आतापर्यंत पदवी स्तरावरील द्वितीय, तृतीय आणि पदव्युत्तर स्तरावरील भाग-2 साठी 25 हजार 697 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, या प्रवेशाची अंतिम तारीख 20 ऑक्टोबरपर्यंत पुन्हा एकदा वाढविण्यात आली आहे. मात्र आता यूजीसीने मान्यता दिल्याने आयडॉलमधील पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाला लवकरच सुरू होणार असल्याची माहिती उपकुलसचिव डॉ. विनोद माळाळे यांनी दिली.