मुंबई - महाराष्ट्रातील सरकार स्थापनेचा पेच अद्यापही कायम आहे. यात भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या वादात शिवसेनेला कोणताही फटका बसू नये, याची शिवसेनेकडून पुरेपूर काळजी घेण्यात आली. शिवसेनेच्या सर्व आमदारांना गेल्या 6 दिवसांपासून मालाड मार्वे येथील द रिट्रीट या हॉटेलमध्ये ठेवले होते. अखेर त्यांना आज जाण्याची परवानगी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.
प्रथम रंगशारदा व त्यानंतर मालाडच्या रिट्रीट हॉटेलमध्ये शिवसेना आमदारांना गेले 6 दिवस ठेवण्यात आले आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ग्रामीण भागातील आमदारांचेही आपल्या मतदारसंघात लक्ष लागलं होतं. त्यामुळे आज आपल्या घरी जाण्याचे आदेश देण्यात आल्याने आमदारांनी समाधान व्यक्त केले. आम्ही शिवसेनेशी एकनिष्ठ असून फुटणार नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोनदा आमदारांशी हॉटेलमध्ये भेट घेऊन संवाद साधला होता. तर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दोनदा आमदारांसोबत हॉटेलमध्ये मुक्काम करत त्यांना दिलासा दिला होता.