मुंबई - अंतिम सत्र/ वर्षाच्या परीक्षा रद्द करा, अशी मागणी विद्यार्थी भारती संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. या पत्रावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे ठसे आहेत.
कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गहिरे होत चालले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने यापूर्वी परीक्षेबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाने प्रथम जुलै महिन्यात परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. परंतु विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आणि कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसल्याने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी परीक्षा रद्द करून मागील परीक्षांच्या आधारावर गुण देण्याची मागणी युजीसीकडे केली आहे. या मागणीवर नाराजी व्यक्त करत राज्यपालांनी राज्य सरकारला सूचना केल्या आहेत. यामुळे अनेक विद्यार्थी निराश झाले आहेत.
लॉकडाऊननंतर अनेक विद्यार्थी आपापल्या गावी गेले आहेत. यातच कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा आयोजित करण्याचा हट्ट धरण्यात येत असल्याबद्दल विद्यार्थी भारती संघटनेने याचा निषेध केला आहे. लाखो विद्यार्थांच्या भवितव्याचा प्रश्न असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालावे, अशी मागणी संघटनेच्या राज्य अध्यक्ष मंजिरी धुरी यांनी केली आहे. या पत्रावर पदवी अभ्यासक्रमाची अंतिम सत्राची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रक्ताचे ठसे लावण्यात आले आहेत. सरकारने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्यास परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा, इशाराही संघटनेने दिला आहे.