मुंबई - येथील आर्थर रोड कारागृहात 77 कैदी व 26 कारागृह कर्मचारी कोरोनाग्रस्त आढल्यानंतर या सर्वांना उपचारासाठी कारागृहाबाहेर हलविण्यात होते. आता मुंबईतील भायखळा येथील महिला कारागृहात एका 54 वर्षीय महिला कैदीचासुद्धा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आढळल्यामुळे पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.
या 54 वर्षीय महिला कैदीच्या शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्यामुळे तिला जेजे रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. या ठिकाणी तिची पहिली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र, 9 मे रोजी दुसऱ्या वेळी केलेली कोरोना चाचणी ही पॉजिटिव्ह आल्यामुळे या महिला कैदीस सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मुंबईतील आर्थर रोड कारागृह व भायखळा महिला कारागृहातील कोणत्याही कैद्याला त्यांच्यावरील खटल्याच्या याचिकेच्या सुनावणीसाठी कारागृहाबाहेर काढण्यात येत नाही. तरीही कारागृहात कोरोना कसा पसरला याचा शोध घेतला जात आहे.
मुंबईतील दोन्ही कारागृहात घनकचरा व्यवस्थापनाची गाडी, भाजीपाला व दुधाची गाडी ही बाहेरून येत असल्याने कोरोनाचा प्रसार झाला असावा, असा अंदाज लावला जात आहे. राज्यात सध्या 60 छोटी मोठी कारागृह असून यात एकूण कारागृहात तब्बल 25 हजार कैदी ठेवण्याची क्षमता आहे. मात्र, बहुतांश कारागृहात मर्यादेपेक्षा अधिक कैदी ठेवले जात असल्याने मुंबई सारखी परिस्थिती इतर कारागृहातही सुद्धा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भायखळा महिला कारागृहात शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी ही सुद्धा आहे. मंजुळा शेट्ये या महिला कैद्यांची जेल पोलिसांनी केलेल्या मारहाणीत झालेल्या मृत्यूमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. ज्यामुळे भायखळा महिला कारागृह मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिले होते. आता, कोरोनाग्रस्त महिला कैद्याशी कारागृहात संपर्कात आलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी घेतली जाणार आहे.
हेही वाचा - बाधितांच्या संपर्कात आलेल्यांना शोधून काढा अन् क्वारंटाईन करा, पालिका आयुक्तांच्या सूचना